रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)- राज्यात पेट्रोल- डिझेलच्या किमतीत वाढ झाली होती. मात्र पेट्रोल- डिझेलवरील व्हॅट राज्य सरकारने कमी केल्यास पेट्रोलचे दर आणखी कमी उतरतील, यासाठी केंद्र सरकार राज्यांवर दबाव टाकत आहे, अशी माहिती फेडरेशन ऑफ महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.
देशातील पेट्रोल- डिझेलचे दर नुकतेच उतरले आहेत. केंद्र शासनाने एक्ससाईज ड्युटी 2 रुपयांनी कमी केल्यामुळे हे दर उतरले आहेत. केंद्र सरकारने हि एक्ससाईज ड्युटी तशीच ठेवली असती, तर दर वाढत गेले असते. पण शासनाच्या या निर्णयामुळे जनतेला दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्य सरकारने पेट्रोल- डिझेल वरील व्हॅट कमी केल्यास राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील. हा व्हॅट कमी करावा यासाठी केंद्र सरकारचा राज्य सरकारवरही दबाव आहे, असे लोध म्हणाले. राज्य सरकारने असे केल्यास एकप्रकारे दरामध्ये समतोल राहील, तसेच इथून जे वाहनचालक कर्नाटक, गोवामध्ये पेट्रोल-डिझेल भरण्यास जातात, ते इथेच थांबतील आणी पर्यायाने आपल्या इथली विक्री वाढेल. त्यामुळे सरकारने हा व्हॅट कमी करावा, असे फोमपेडीचे अध्यक्ष लोध यांनी सांगितले. तसेच दररोज बदलणाऱ्या दरांमुळे पेट्रोल पंप चालकांचं नुकसान होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.