रत्नागिरी ( विशेष प्रतिनिधी) : पेट्रोल डिझेलवरील एक्साईज ड्युटी २ रुपयांनी कमी करण्यात आल्यामुळे ग्राहकांना दरामध्ये थोडा दिलासा मिळाला आहे. परंतु, ज्या प्रमाणात एक्साईज ड्युटी वाढविण्यात आली आहे, ते पाहता दोन रुपयांनी जी कमी करण्यात आली आहे, ते निराशाजनक असल्याचे मत फामपेडाचे महाराष्ट्र अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर चांगलेच भडकले आहेत. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे. त्यातच पेट्रोलपंप चालकांच्याहि काही मागण्या होत्या. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमती कमी करण्यासाठी सरकार या केंद्रीय अर्थसंकल्पात काही चांगले निर्णय घेते का?, याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. पण प्रत्यक्षात मात्र पेट्रोल -डिझेलवरील एक्साइज ड्युटी २ रुपयांनी कमी करण्यापलीकडे या अर्थसंकल्पात काहीच करण्यात आलेले नाही. या निर्णयामुळे ग्राहकांना दरामध्ये थोडा दिलासा मिळू शकतो, पण एक्साईज ड्युटी ज्या प्रमाणात वाढविण्यात आलेली आहे, त्या प्रमाणात जर कमी केली असती तर ग्राहकांना चांगलाच फायदा मिळाला असता असे मत फामपेडाचे महाराष्ट्र अध्यक्ष उदय लोध यांनी व्यक्त केले. तसेच पेट्रोलपंप चालकांच्या मागण्यांबाबत विचार अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. तसेच पेट्रोल-डिझेल जीएसटी खाली आणावं अशी मागणी होत होती, मात्र त्याचाही विचार या अर्थसंकल्पात झालेला नाही. पेट्रोल-डिझेल जीएसटी खाली आणलं असतं, तर संपूर्ण देशात एकच दर राहिले असते आणि पर्यायाने दरही कमी झाले असते आणि ग्राहकांनाहि त्याचा फायदा झाला असता. पण असं काहीच या अर्थसंकल्पामध्ये झालेले नाही. त्यामुळे २ रुपयांनी स्टॅम्प ड्युटी कमी करून ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला असला तरी एकूण विचार करता हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचं उदय लोध यांनी म्हटले आहे.