मुंबई – पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड दरवाढ करून केंद्र सरकारने जनतेचे जगणे मुश्कील केले आहे. सध्या पेट्रोलचा दर शंभर रुपयांचा पार गेला आहे. एक रुपया इंधन दरवाढ झाली की, त्यावेळी रस्त्यावर उतरून आंदोलने करणारे भाजपाचे नेते कार्यकर्ते कुठे गेले आहेत असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव श्रीरंग बरगे यांनी विचारला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करत लुट करत आहे. त्यात आणखी १८ रुपये रस्ते विकास सेसच्या माध्यमातून तर ४ रुपये कृषी सेसच्या माध्यमातून घेतले जात आहेत. करांशिवाय आज पेट्रोलची किंमत ३२ रुपये ७२ पैसे प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ३३ रुपये ४६ पैसे प्रति लिटर आहे. पण मोदी सरकारने डिझेलवर ८०० टक्के हुन अधिक तर पेट्रोलवर २५० टक्के हुन अधिक एक्साईज ड्यूटी लावून पेट्रोलचे दर १०७. २६ रुपये लिटरवर तर डिझेलचे दर ९६. ४१ रुपये लिटरपर्यंत वाढवले आहेत. आता पुन्हा एलपीजी गॅस सिलींडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केल्यामुळे गॅस सिलिंडरचा दर ८५९ रुपये झाला आहे. जनतेमध्ये या महागाईविरोधात प्रचंड असंतोष आहे. केंद्र सरकारने ७ वर्षात चक्क १३.५ लाख कोटी रुपये कमावले असल्याचा आरोप बरगे यांनी केला आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ तात्काळ मागे घेऊन सामान्यांना दिलासा दिला पाहिजे, असेही ते म्हणाले.