
मुंबई, दि. ९ (प्रतिनिधी) – पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच घरगुती व व्यावसायिक गॅसच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असताना सरकार मात्र या गंभीर प्रश्नाकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप करत भांडुप पश्चिम स्टेशन रोड येथे शिवसेना (उबाठा) पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रभाग क्र. ११४ च्या नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी सरकारच्या धोरणांचा विरोध करीत संताप व्यक्त केला.
देशभरात वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. घरातील किराणा, मुलांचे शिक्षण, प्रवास खर्च, वीजबिले व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींनी कुटुंबांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. मात्र जनतेच्या या वेदनांबाबत सरकारला कोणतीही संवेदना उरलेली नसल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. याच निषेधार्थ भांडुपमध्ये झालेल्या आंदोलनात महिला शिवसैनिकांनी थेट रस्त्यावर चूल पेटवून जेवण तयार केले. वाढत्या गॅस दरांमुळे भविष्यात सर्वसामान्यांवर पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येईल, असा संतप्त इशारा यावेळी देण्यात आला. तसेच शिवसैनिकांनी गळ्यात कांदा व बटाट्यांच्या माळा घालून सरकारच्या अपयशी आर्थिक धोरणांचा निषेध केला.
जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे व सरकार मात्र सत्तेच्या सुखात रमले आहे. अच्छे दिनांच्या घोषणा देणाऱ्यांनी आज सर्वसामान्यांच्या घरातील चूल विझवण्याचे काम केले आहे. महागाईमुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले असताना सरकारला त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही, अशी घणाघाती टीका नगरसेविका राजोल संजय पाटील यांनी केली. दरवाढ बंद करा, जनतेला न्याय द्या, गॅस दरवाढीने जनता त्रस्त, सरकार मात्र मस्त अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला. या आंदोलनात विभागप्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेविका दिपमाला बढे, सुरेश शिंदे, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते. महागाईच्या मुद्द्यावर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून जनआंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.















