डोंबिवली, (प्रशांत जोशी) : रक्षाबंधनाचा सण दोन दिवसांवर आल्याने शहरातील बाजारपेठा विविध प्रकारच्या आकर्षक राख्यांनी सजल्या आहेत. राख्या खरेदीसाठी स्टॉल्सवर गर्दी होत असून डायमंट राख्यांसह कार्टूनच्या राख्यांना अधिक मागणी होत आहे.
बालगोपाळांचा लाडका बाल गणेश, भीम, सुपरमॅन व स्पायडरमॅन यांच्या प्रतिकृती राख्यांवर दिसत आहेत. यावर्षीही चिनी बनावटीच्या राख्या स्टॉलवर उपलब्ध असल्या तरी डायमंट, रुद्राक्ष, कुंदन, गोंडा, मोती डिझाईन, तिरंगा, कछवा, स्वस्तिक राख्या मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय चांदीच्या ब्रेसलेटच्या राख्यांनाही चांगली मागणी आहे. फॅन्सी राख्यांबरोबर पारंपरिक राख्या, रेशीम, मणी, कापडापासून बनवलेल्या राख्या दुकानात विक्रीस आहेत. बाजारात 5 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत राख्यांच्या किमती आहेत. औक्षणासाठी लागणारी नक्षीदार ताटांसह शुभेच्छापत्रे सुद्धा महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत.
रक्षाबंधन अगोदर जवळ जवळ पंधरा दिवस आधीपासूनच राखीची विक्री सुरू झालेली असते. राखीची किंमत सुमारे १० ते १२ रुपयांच्या ते जास्तीत जास्त 250 पर्यंत आहे. शहरात सुमारे 125 ते 150 राखी विक्रीची दुकाने लागली असून यावर्षी जास्त स्पर्धा आहे असे राखी विक्रेता विनायक चौगुले यांनी सांगितले. अमेरिकन डायमंट राख्यांना जास्त मागणी आहे. साधारण दिवसभर अडीच ते तीन हजार रुपयांच्या राख्या विकल्या जातात. पूर्वी दिवसाला सुमारे पाच हजार रुपयांची विक्री होत होती. या वर्षी राखी विक्रीची दुकाने वाढली असून त्याचा परिणाम या धंद्यावर होत आहे असेही त्यांनी सांगितले.