मुंबई : भारतात पहिल्यांदा हंबोल्ट पेंग्विनचा जन्म झाला असून भायखळ्याच्या राणीबागेत मादी फ्लिपरने एका गोंडस बाळाला जन्म दिला. ५ जुलैला मादी फ्लिपरने अंडे दिले होते, त्यातून १५ ऑगस्टला रात्री गोंडस पिल्लाचा जन्म झाला. छोट्या पेंग्विनची प्रकृती स्थिर असून त्याला आणखी १६ तास प्राणी संग्रहालय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्याचे लिंग तपासण्यासाठी त्याची डीएनए तपासणी केली जाणार आहे.
मुंबईतील राणी बागेत २६ जुलै २०१६ रोजी कोरियावरून हंबोल्ट जातीचे ८ पेंग्विन आणण्यात आले होते. त्यामध्ये ३ नर व ५ मादी पेंग्विन होते. डॉनल्ड, डेझी, पपाय, डोरी, ऑलिव्ह, बबल, मोल्ट, फ्लिपर, अशी त्यांची नावे होती. त्यांना खास बनविण्यात आलेल्या शीत वातावरणातील कक्षात ठेवण्यात आले होते. भारतात पहिल्यांदा हंबोल्ट पेंग्विनचा जन्म झाला. ५ जुलैला अंडे दिल्यानंतर फ्लिपर आणि मोल्ट दोघेही अंड्याला ऊब देत होते. यामध्ये फ्लिपर सर्वात जास्त ५ दिवस अंड्याला ऊब दिली. भारतातील पहिलीच घटना असल्याने प्राणी संग्रहालयातील डॉक्टर सातत्याने विदेशातील तज्ज्ञांच मार्गदर्शन घेत होते. राणी बागेचे खास आकर्षण असलेल्या पेंग्विन कक्षात एका गोंडस पेंग्विनचा जन्म झाला. त्यामुळे पेंग्विन कक्षात जल्लोषाचे वातावरण आहे. तेथील सात पेंग्विनच्या कुटुंबात या नवीन भिडूला पाहण्यासाठी मुंबईकरही आतुर झाले आहेत.