
डोंबिवली : गेले अनेक दिवस के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात विद्यार्थ्याच्या तक्रारी होत्या. या बाबत तक्रार करुनही संचालक दाद देत नव्हते. अखेर आज विद्यार्थी भारती संघटनेने महाविद्यालयासमोर निदर्शने केली व निषेध केला. दरम्यान पोलींसानी आठ दहा निदर्शकांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालयात गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वा फी आकारली जाते याविरुध्द पाठपुरावा करुनही कोणतीच दखल महाविद्यालय घेत नाही. यामुळे मंगळवारी निदर्शने करण्यात आली. विद्यार्थ्यांचे बेकायदेशीर अतिरिक्त पैसे उकळले ते परत करण्यात यावेत यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर देसाई यांना विचारले असता त्यानी विद्यार्थी भारती संघटना ही मान्यताप्रप्त नाही म्हणून नियमाप्रमाणे त्याना भेटण्याचा प्रश्नच येत नाही. जी फी आकारली जाते ती नियमाप्रमाणे असून त्याची रितसर पावती दिली जाते. या संघटनेत महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा सहभाग नाही असेही त्यानी सांगीतले. मंजीरी धुरी, जितेश पाटील, साक्षी भोईर यांनी नेतृत्व केले.

















