मुंबई, प्रतिनिधी:- पवईतील म्हाडाच्या इमारतीला सोमवारी सांयकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. आग सात मजल्यापर्यंत पसरल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. मात्र, अग्निशमन दलाने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवल्याने दुर्घटना टळली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.
पवई येथील हिरापन्ना मॉल जवळील म्हाडाची वसाहत आहे. येथील बिल्डींग क्रमांक १४ मधील सहाव्या मजल्यावरील एका घरात सायंकाळी ६ः३० च्या सुमारास आग लागली. आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट बाहेर १४ व्या मजल्यापर्यंत पसरल्याचे दिसत होते. या आगीची वर्दी मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. सांयकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी आग पूर्णतः विझविण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे दलाच्या जवानांनी सांगितले.