रत्नागिरी । पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं आहे. सलग चौथ्या दिवशी जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा सुरू आहेत. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. जिल्ह्यात दरड कोसळण्याचं सत्र पुन्हा एकदा सुरू झालं आहे. राजापूर तालुक्यातील मुर-तळवडे रस्त्यावर मध्यरात्री दरड कोसळल्याने जामदा खोऱ्यातील काही गावांचा संपर्क तुटला आहे. यामध्ये मुर, काजीर्डा, कोळंब, वाळवंड, सावडाव जवळेथर, आजीवली, नेर्ले, जांभवडे अशा गावांचा समावेश आहे. सध्या दरड बाजूला करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
रत्नागिरीतल्या काजळी नदीच्या रौद्ररूपाचा फटका जुवे, हातीस, चांदेराई, पोमेंडी, सोमेश्वरला बसला आहे. राजापूर, चिपळूण, संगमेश्वरमध्येही काही ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. गेल्या दोन महिन्यात जिल्ह्याला तीन ते चार वेळा पुराचा फटका सहन करावा लागला होता. या पुरामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं होतं. याचा सर्वाधिक फटका चिपळूण, राजापूर, रत्नागिरीला बसला होता. हे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. मात्र गेल्या आठवडाभरापासून पावसाने पुन्हा एकदा आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यातही गेले चार दिवस तर पावसाने कहरच केला आहे. ऐन गणेशोत्सवात ही मुसळधार बरसात सुरू असल्याने चाकरमानी, गावकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. गणेशचतुर्थीच्या आगमनाच्या आदल्या दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. आज चौथ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान येत्या 48 तासात आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. जर पावसाचा जोर असाच राहिला तर पुन्हा जिल्ह्याला पुराचं फटका बसण्याची शक्यता आहे.
24 तासांत 100.56 मिमी पाऊस
दरम्यान गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 905 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी 100.56 मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात पडला असून चिपळूणमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 140 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल राजापूरमध्ये 115 मिमी, खेडमध्ये 110, दापोलीत 105 मिलिमीटर , तर मंडणगडमध्ये 95 मिमी आणि गुहागरमध्ये 93 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर रत्नागिरी, संगमेश्वर आणि लांजा तालुक्यातही 80 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.