
रत्नागिरी : मी देखील तुमच्या सारखाच जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी होतो. चला आपण गप्पा मारु या असं म्हणताच पावस जवळील गोळप ऊर्दू जिल्हा परिषद केंद्र शाळेतील चिमुकल्यांचे चेहरे खुलले आणि मग यातील शाळेचा पहिला दिवस असणाऱ्यांचा प्रवेशोत्सव सोहळा रंगत गेला. विद्यार्थ्यांशी खुद्द जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे स्वागत करताना संवाद साधत होते.
नव्या शैक्षणिक वर्षाला आज प्रांरभ झाला. या निमित्त जिल्ह्यातील सुमारे 13 हजार नव्याने शाळेत दाखल होणाऱ्यांचा स्वागत सोहळा शाळा शाळांमध्ये रंगला या दिवशी गोळप ऊर्दू शाळा गाठून मुलांशी संवाद साधला. शाळेच्या 90 वर्षांच्या इतिहासात जिल्हाधिकारी यांनी भेट देण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
साडेपाच वर्षांची चिटुकली अफशा प्रथम बोलायला उठली तिच्याशी गप्पा मारताना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी चॉकलेट दिले. याचे रॅपर कुठे टाकणार असे विचारताच त्या चिमुकलीने डस्टबीनमध्ये टाकणार सांगितल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तिचेच उदाहरण देत देशाचे चांगले नागरिक बना, देशात स्वच्छता हवी त्याची सवय याच वयात लागायला हवी असे सांगितले.
संवाद खुलत गेला आणि मग सातव्या वर्गातील अमन हिने प्रश्न केला की जिल्हाधिकारी यांची कामे काय असतात. त्याचे संवादात्मक उत्तर दिल्यानंतर जिल्हाधिकारी चव्हाण यांच्यासमोर शाळेतील मुलांमुलींनी विविध प्रश्नांची मालिकाच सादर केली आणि प्रवेशोत्सवाचा हा सोहळा रंगत गेला.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी स्वत: आवर्जुन चॉकलेटस मुलांसाठी नेऊन तिथे वाटली. यावेळी त्यांच्यासमवेत रत्नागिरी पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी देखील या प्रवेशोत्सवात सामील झाले. या निमित्ताने सर्वांनाच आपला शाळेचा पहिला दिवस आठवला.
शिक्षण विस्तार अधिकारी उत्तम भोसले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुबीन नाखवा, केंद्रप्रमुख महम्मद जैनुद्दीन सय्यद आणि या शाळेतील शिक्षकवृंद या सोहळ्यात सामील झाला. या शाळेत 16 नव्या विद्यार्थ्यांचा यावर्षी प्रथम प्रवेश झाला आहे.
अतिशय उत्तम शिक्षण देता यावे याकरीता प्रत्येक वर्गखोली डिजिटल करण्यात आली आहे तसेच मुलांच्या संगणक शिक्षण आणि शारिरीक शिक्षण, चित्रकला आदी विषयांवरही शाळा लक्ष देत असल्याचे केंद्रप्रमुख सय्यद यांनी यावेळी सांगितले.
त्या शाळेतल्या चिमुकल्यांशी संवाद साधताना एखादी कविता किंवा गाणं म्हणा असं जिल्हाधिकारी सांगितल्यावर दुसऱ्या वर्गापासून पुढील सर्व मुलामुलींनी सुंदरशी प्रार्थना यावेळी सादर केली. प्रत्येकाच्या स्मरणात राहील असा हा प्रवेशोत्सव सोहळा ठरला















