रत्नागिरी : शहरातील दैवज्ञ पतसंस्थेत एटीएम सुविधा सुरू करण्यात आली आहे. ही सुविधा देणारी दैवज्ञ पतसंस्था पहिली ठरली आहे. आज पहिल्या श्रावण सोमवारी पतसंस्थेचे अध्यक्ष विजय पेडणेकर यांनी या एटीएमचे फीत कापून व कार्डद्वारे पैसे काढून उद्घाटन केले.
मुख्य बाजारपेठेत गोखले नाका येथे असलेल्या दैवज्ञ पतसंस्थेने एटीएम सुविधा सुरू करण्याबाबत ग्राहकांनी मागणी केली होती. बाजारात जवळपास एटीएम केंद्र नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत होती. हे एटीएम केंद्र सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत चालू राहणार असून सर्व प्रकारच्या बॅंकांच्या एटीएम कार्डमधून येथे पैसे काढता येणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.
उद्घाटन कार्यक्रमाला आनंद वीरकर, किशोर कारेकर, चंद्रकांत भुर्के, प्रमोद खेडेकर, श्रीनिवास जोशी, चंद्रकांत गोठणकर, राजेश भुर्के, अनिल खातू, अनिल उपळेकर, राजन कारेकर, सौ. अंजली पेडणेकर आदी उपस्थित होते. पतसंस्थेची सध्या वर्धापनदिन समृद्ध ठेव योजना 15 जुलैपासून सुरू आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांना 9.75 टक्के आणि सर्वसामान्य व्यक्तींसाठी 9.50 टक्के व्याजदर या योजनेअंतर्गत दिला आहे. या योजनेतही ठेवीदारांनी ठेव गुंतवावी, असे आवाहन अध्यक्ष विजय पेडणेकर यांनी केले आहे.