मुंबई, (निसार अली) : कोरोनाच्या घडामोडी पोहचविण्याचे महत्वाचे कार्य करणार्या 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. या पत्रकारांच्या कुटुंबियांची काळजी ऑल जॉर्नलिस्ट अँड फ्रेंड्स सर्कल या पत्रकारांच्या संघटनेने व्यक्त केली आहे. या पत्रकारांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती, तरीही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तेव्हा या पत्रकारांच्या कुटुंबियांची कोरोना चाचणी तातडीने करावी, अशी मागणी एजेएफसीने केली आहे.
तसेच बाधित पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ते पत्रकार काम करत असलेल्या व्यवस्थापनाकडून मदत मिळणे आवश्यक आहे. व्यवस्थापन आणि संपादक यांचे शांत बसून राहणे अन्यायकारक आहे, एजेएफसी त्याचा निषेध करते. पत्रकारांचा 50 लाखांचा विमा तातडीने काढला गेला पाहिजे, अशी मागणी एजेएफसीने केली आहे.
पत्रकारांची चाचणी केली गेली म्हणून ते बाधित असल्याचे तरी समजले. यातील अनेक पत्रकारांत कोणत्याही प्रकारची लक्षणे नव्हती. आज या पत्रकारांचे कुटुंबिय चिंतेत आहे. त्यांना होम क्वारनटाईन केले गेले आहे. राज्य सरकारने तातडीने त्यांची चाचणी करावी, त्यांना योग्य ते उपचार द्यावेत, मानसिक बळ द्यावे अशी मागणी एजेएफसी केंद्रीय व राज्य पदाधिकारी यांनी केली आहे . एजेएफसी या सर्व पत्रकार बांधवांच्या बाजूने उभी आहे, असे एजेएफसीचे राष्ट्रीय अध्यक्ष यासीन पटेल आणि राष्ट्रीय सचिव विकास कुलकर्णी यांनी संगितले .