मुंबई : पत्रकारिता आणि साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांचे आज सोमवारी पहाटे निधन झाले. प्रकृती अस्वास्थामुळे रविवारी सकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र तिथेच पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७६ वर्षांचे होते. साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांनी लिहिलेल्या मुंबई दिनांक आणि सिंहासह या कादंबर्यांनी साहित्य विश्वात मानाचे स्थान मिळवले. आजही या कादंबर्या तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत.
वयोमानामुळे गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती खालावत जात होती. त्यांना श्वसनाचा आजार जडला होता. हा त्रास वाढू लागल्याने सायन रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. साधू यांचे पार्थिव वांद्रे येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार आहे. साधू यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतल्याने सोपस्कार पध्दतीने त्यांची अंतविधी पार पाडली जाणार आहेत. वांद्रे येथील घरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
अरुण साधू यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. सहा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविण्याचा मानही त्यांना मिळाला होता. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानंही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
साधू यांची ग्रंथसंपदा :
मुंबई दिनांक
सिंहासन
महाराष्ट्र
काकासाहेब गाडगीळ
फिडेल, चे आणि क्रांती
ड्रेगन जागा झाल्यावर
मुखवटा
तिसरी क्रांती
ग्लानीभोवती भारत
त्रिशंकू
बहिष्कृत
स्फोट
शोधयात्रा
पडघम