मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : पती-पत्नीत वाद असतात. ते वेळीच सामंजस्याने सोडविले न गेल्यास त्याचे गंभीर परिणाम दोघांना भोगावे लागतात. घटस्फोट होऊन संसाराची राखरांगोळी होते. असाच प्रकार वांद्रे येथील खेरवाडीत घडला. या प्रकरणात पत्नीने घटस्फोट वा विभक्त राहण्याच्या निर्णय न घेता टोकाचे पाऊल उचलले आणि कट रचून पतीची हत्याच घडवून आणली.
खेरवाडीतील शासकीय वसाहतीतील इमारत क्र. ३ च्या टेरेसवर एका व्यक्तिची धारधार शस्त्राने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना २८ मे रोजी घडली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शीव येथील रुग्णालयात पाठविण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव सचिन दीपक चारी असल्याचे समजले. मृताची ओळख पटल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. या दरम्यान मृताच्या पत्नीकड़े पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा तीने उडवाउड़वीची उत्तरे दिली. त्यामुळे तीच्यावरील संशय बळावला.
मग मात्र पोलिसांनी तीला पोलिसी खाक्या दाखविताच पत्नीने गुन्हा कबूल केला. पती सचिन चारी सोबत सतत भांडण होत असल्यामुळे त्याचा खून करण्याचा कट रचल्याचे तीने चौकशीत कबूल केले. चेतन वाघेला याने खून केल्याचे पोलिसांना मृत सचिनच्या पत्नीने सांगितले. घटनेच्या दिवशी चेतन वाघेला याने सचिन चारीला दारु पिण्याच्या बहाण्याने शासकीय वसाहतीच्या बिल्डिंग क्रमांक ३च्या गच्चीवर नेले. त्याला दारु पाजुन त्याची धारधार शस्त्राने हत्या केली. हत्येनंतर चेतनने मृत सचिनच्या घरी जावून रक्त लागलेले कपडे बदलले. सचिनच्या पत्नीने सोन्याची चैन देऊन चेतनला पळून जाण्यास सांगितले. या कबुलीजबाबी नंतर पोलिसांनी सचिनची पत्नी सोनाली हिला संगनमत करून हत्या केल्याप्रकरणी अटक केली. न्यायालयाने तीला न्यायालयीन कोठडी दिली आहे. या घटनेनंतर चेतन मुंबईबाहेर पळून गेला होता.
नाशिक, तसेच शिर्डी तेथून गुजरात राज्यात सूरत, बड़ोदा, अहमदाबाद येथून चेतन नाशिक येथे आल्याची माहिती मंगळवारी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी नाशिक येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला सापळा रचुन अटक केली. आरोपीला न्यायालयाने २७ जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी दिली.