
रत्नागिरी, (आरकेजी) : गेल्या दोन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेला श्रीकृष्ण अनंत पाटील उर्फ पाटीलबुवा व त्याच्या तीन साथीदारांचा जामीन अर्ज रत्नागिरी जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी फेटाळल्याने पाटील बुवाच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. यापुर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज दोषारोपपत्र दाखल होताच पाटीलबुवाने मागे घेतला. त्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकाऱयांकडे जामीनासाठी अर्ज सादर केला. मात्र सरकारी वकिलांनी आपल्या युक्तीवादाने पाटीलबुवाचे सर्व प्रयत्न हाणून पाडल़े. विभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी पाटीलबुवा व प्रशांत प्रभाकर पारकर, अनिल मारूती मयेकर, संदेश धोंडू पेडणेकर यांच्याविरूद्ध भादवि कलम 420, 294, 34 व जादुटोणा विरोधी कायद्यानुसार दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी पाटीलबुवाने जामीनासाठी मुख्यन्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. तीन दिवस चाललेल्या दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने पाटीलबुवाविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेत जामीन अर्ज फेटाळून लावल़ा.