नवी दिल्ली : राष्ट्रीय औषध निर्माण दरविषयक प्राधिकरणाने, औषधांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी, महत्वाच्या अनेक उपाययोजना केल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी आज लोक सभेत एका लेखी उत्तरात दिली. औषध (दर नियंत्रण) आदेशा अंतर्गत या उपाययोजना करण्यात आल्या असून, या उपाययोजना लागू केल्यापासून मे 2019 पर्यंत, जास्त दर आकारणाऱ्या 2033 कंपन्यांना याबाबत नोटीसा जारी करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दर निश्चिती मुळे, रुग्णांच्या 12,447 कोटी रुपयांची बचत झाल्याची माहिती त्यांनी दिली.
औषधांच्या किमती नियंत्रणात राहाव्या यासाठी, राष्ट्रीय औषध दर प्राधिकरणाने, 530 सुचीबद्ध फॉरम्यूलेशनच्या कमाल किमती निश्चित केल्या.
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये घालण्यात येणाऱ्या स्टेंटच्या किमती 2017 च्या फेब्रुवारीत अधिसूचित करण्यात आल्या यामुळे स्टेंटच्या किमतीत 85 टक्के घट झाली.
गुडघा प्रत्यारोपणाच्या कमाल किमती 2017 च्या ऑगस्टमध्ये अधिसूचित करण्यात आल्या यामुळे किमतीत 69 टक्के घट झाली
प्राधिकरणाने कर्करोग प्रतिबंधक 42 बिगर सूचीबद्ध औषधांच्या कमाल किमती निश्चित केल्या. त्यामुळे या औषधांच्या 526 ब्रॅन्डच्या कमाल किरकोळ किमतीत 90 टक्के घट आढळून आली.