मुंबई, दि. १८ : मकर संक्रांतीला तोंड गोड होण्याऐवजी पतंगाच्या मांज्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे बंदी असलेल्या नायलॉन उर्फ चायनीज मांज्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर गुन्हे दाखल करून त्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच मृतांच्या कुटुंबीयांना किमान 50 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
सण साजरे करताना दाखवण्यात येणाऱ्या अतिउत्साहामुळे सर्वसामान्यांचे जीव धोक्यात येत असून दहीहंडी असो वा संक्रातीच्या निमित्ताने केलेली पतंगबाजी, गेली काही वर्षे कुणाचा ना कुणाचा तरी बळी जात आहे आणि आता ही संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारनेच याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. यावर्षी पतंगबाजीसाठी धोकाधक ठरणारा नायलॉन मांजा वापरल्यामुळे महाराष्ट्रात तिघांचा तर गुजरात मध्ये सहा जणांचा बळी गेला आहे.
कुटुंबीयांना मदत मिळावी
ठाणे जिल्ह्यातील वाडा येथून उल्हासनगरला दुचाकीवरून निघालेल्या संजय हजारे या 46 वर्षाच्या व्यक्तीचा भिवंडी येथे नायलॉनच्या मांज्यामुळे गळा कापला जाऊन मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबात तेच एकटे कमावते असून दोन मुले पत्नी व आई-वडील असा परिवार असल्याची माहिती आहे. कोणाच्यातरी बेजबाबदार वर्तनामुळे आज हा परिवार निराधार झाला आहे. याच उड्डाणपुलावर आधी आणखी एक दुचाकीस्वार थोडक्यात बचावला होता. राज्यात नागपूरलाही दोघांचा बळी गेला आहे. तर गुजरातमध्ये तीन मुले पतंगाच्या मांजामुळे गळे चिरल्याने तर आणखी तीन अन्य कारणांनी मरण पावली आहेत. याशिवाय केवळ मुंबई परिसरात ९००हून अधिक पक्षी जखमी झाले आहेत. हे अतिशय भीतीदायक असून त्यामुळे राज्य सरकारने नायलॉनच्या मांज्यावर कायमची बंदी घालावी, त्याच्या आयातीला मनाई करावी आणि या मांज्याची आयात, निर्मिती वा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलीम भाटी, ज्येष्ठ कार्यकर्ते जगदिश नलावडे, सरचिटणीस अॅड. प्रशांत गायकवाड,आणि युवा अध्यक्ष केतन कदम यांनी केली आहे.
तसेच राज्यातील तिन्ही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचे मदत देण्यात यावी, असेही पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या तेथील अधिकाऱ्यांनाही याबाबत जबाबदार धरून त्यांनाही शिक्षा वा दंड करण्यात यावा, अशी पक्षाची मागणी आहे. कारण बंदी असलेल्या मांज्याचा वापर कसा होऊ शकतो? तसेच पोलिसांनी याबाबत वेळीच आदेश काढले असते तर कदाचित हे मृत्यू टाळू शकले असते त्यामुळे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही समज देण्यात यावे आणि दरवर्षी वेळीच याबाबत आदेश काढून कठोर शिक्षेचे इशारा देण्यात यावा, अशी मागणी जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.