मुंबई : राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित केले असून या जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना आणि मंजूर प्रकल्पांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल रविवारपासून ३ दिवसाच्या कोकण दौ-यावर आहेत. दि. २ ते ४ एप्रिल अशा तीन दिवसाचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे.
मंत्री रावल यांच्या तीन दिवसीय कोकण दौ-यात विजयदुर्ग, देवगड किल्ला, कुणकेश्वर, मिठबाव, तोंडावली / वायंगणी येथे सी वर्ल्ड नियोजित स्थळाची पाहणी, तारकर्ली स्कुबा डायव्हिंग सेंटरची पाहणी, सिंधुदुर्ग किल्ला, निवती किल्ला, सागरेश्वर, कुडाळ,आरवली- मोचेमाड, शिरोळा येथील नियोजित ताज हॉटेलची जागा पाहणी, सावंतवाडी येथील शिल्पग्रामची पाहणी करण्यात येणार आहे. या दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकास आराखड्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत चर्चा, तसेच समुद्र विश्व प्रकल्प (सीवर्ल्ड), गड व किल्ले विकासाबाबत लोकप्रतिनिधींच्या सूचनांवर चर्चा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकरिता विविध विकासकामे हाती घेण्यात आले असल्याची माहिती मंत्री श्री. रावल यांनी दिली.