मुंबई : पर्यावरण रक्षण व प्रदूषण नियंत्रणात अधिक गतीमानता येण्यासाठी सर्वांनी सांघिक भावनेने काम करणे व सहभागी होणे ही महत्वाची गरज आहे. त्या दृष्टीने विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पर्यावरण विभागाच्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या आढावा बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सागरकिनारा अधिनियमनांच्या अनुषंगाने कांदळवनांचे संरक्षण करण्याबरोबरच पर्यटनाला कशी चालना देता येईल. त्याचबरोबर प्लास्टिक कचऱ्याचे नियंत्रण, घनकचरा व्यवस्थापन, ध्वनी प्रदूषण नियंत्रणांतर्गत विभागीय क्षेत्र निश्चिती आराखडा, जल प्रदूषण व घनकचरा व्यवस्थापन याकरिता तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयातील संबंधित विभाग, नगरविकास, ग्रामविकास, वने व तत्संबंधित खात्यांबरोबर बैठका घेऊन तत्काळ गतीमान कामकाजास सुरुवात करावी, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
संपूर्ण राज्यात शहरांपासून ते ग्रामीण भागापर्यंत घनकचरा, प्लास्टिक कचरा, जल प्रदूषण, हवा प्रदूषण, ई-वेस्ट, ध्वनी प्रदूषण या विविध समस्यांवर तत्काळ उपाययोजना करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका यांच्या वार्षिक अर्थसंकल्पातील 25 टक्के निधी हा घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी शुद्धीकरणाकरीता राखुन ठेवण्याबाबत संबंधित आस्थापनांना यापुर्वीच निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती यावेळी देण्यात आली.
बैठकीला पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई-रविंद्रन व पर्यावरण विभागाचे संचालक नरेंद्र टोके व इतर अधिकारी उपस्थित होते.