नवी दिल्ली : पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 5 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या पर्यटन पर्वाचा आज समारोप झाला. तब्बल तीन आठवडे चालेल्या या पर्यटन पर्वात 18 मंत्रालयांसह 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी झाल्याचे पर्यटन मंत्रालयाच्या सचिव रश्मी वर्मा यांनी सांगितले. यासंदर्भात नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्या आज बोलत होत्या.
या पर्यटन पर्वात आपल्या देशातील विविध पर्यटन स्थळांचे दर्शन घेण्यासाठी ‘देखो अपना देश’ तसेच ‘टुरिझम फॉर ऑल’ असे उपक्रम राबविण्यात आले. पर्यटन संबंधी प्रश्न मंजुषा, निबंध, वादविवाद, चित्रकला स्पर्धा अशा विविध उपक्रमांमधे नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवल्याची माहिती वर्मा यांनी दिली. पर्यटन क्षेत्रातील भागधारकांसाठी कौशल्य विकासाची आवश्यकता, पर्यटनातील नाविन्य अशा विविध विषयांवर आधारीत चर्चासत्रे आणि कार्यशाळांचेही आयोजन करण्यात आले.