रत्नागिरी : यावर्षीही रत्नागिरी नगरपरिषदेकडून 29, 30 एप्रिल आणि 1 मे या कालावधीत या पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे या सुटीच्या कालावधीत कोकणात फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी हा महोत्सव म्हणजे एक पर्वणीच ठरणार आहे. या महोत्सवात गुहा सफर, रॅपलिंग, व्हॅलीक्रॉसिंग, बॅकवॉटर सफारी, स्कूबा डायव्हींगबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याची संधी पर्यटकांना लाभणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राहुल पंडीत यांनी दिली आहे. कोकणच्या लोककलेचा आस्वादही पर्यटकांना या महोत्सवात घेता येणार आहे. नमन, खेळे, पालखी नृत्य, जाखडी यासारख्या कोकणी कलाकृतींचा समावेश या लोककलांमध्ये असणार आहे.
29 एप्रिलला राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते या पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे उपस्थित राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी दिली आहे, तर 1 मे रोजी या रत्नागिरी पर्यटन महोत्सवाचा समारोप पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. गेल्यावर्षीपासून रत्नागिरी नगर परिषद पर्यटन महोत्सवाचं आयोजन करत आहे. गेल्या वर्षी या महोत्सवाला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. तीन दिवसांच्या या पर्यटन महोत्सवावेळी दहा हजार पर्यटक रत्नागिरीत दाखल झाले होते. यावर्षीही या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यक्त केला आहे.