ठाणे : बुरोंडी-महामाई नगरचा सुपुत्र पार्थ विलास गोवले याने जेईई (मेन्स) परिक्षेत सरासरी 99.22 परसेंटाईल गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले. त्याच्या या यशाबद्दल कौतुकाचा वर्षाव होत आहे. पार्थ ठाणे येथे वास्तव्यास आहे. त्याचे गाव रत्नागिरी जिल्हा दापोली तालुक्यातील बुरोंडी-महामाई नगर हे आहे.
ठाणे येथील वसंत विहार स्कुल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज येथे त्याचे दहावीपर्यंत शिक्षण झाले. दहावीला त्याला 92.80 टक्के मिळाले होते. बारावीला त्याने पेस ज्युनिअर सायन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. बारावीला त्याला 89.17 टक्के मिळाले. त्याने जेईई परीक्षेकडे लक्ष केंद्रित केले. अथक परीश्रम आणि सराव, पालकांचा पाठींबा, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे पार्थला यश मिळवणे सोपे गेले.
आपल्या यशाचे श्रेय आईवडील, शिक्षक यांना पार्थने दिले. पहाटे लवकर उठून अभ्यास करणे, अभ्यासाचे वेळापत्रक बनविणे, दिलेला गृहपाठ त्याच दिवशी करणे, कठीण वाटणारी गणिताची, रसायनशास्त्राची समीकरणे सोपी कशी होतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असा सल्ला पार्थने इतर विद्यार्थ्यांना दिला.
पार्थ याचे वडील विलास गोवले ठाणे येथील प्रसिद्ध इंटिरिअर डिझाईनर आहेत तर आई सुवर्णा या वास्तुविशारद आहेत. दोघांनीही पार्थला मिळालेल्या यशाबाबत आनंद व्यक्त केला. पार्थला आर्टिफिशियल इंटिलीजन्स आणि कोडिंगमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. लहानपणापासूनच तो हुशार आहे. असे त्याचे पालक म्हणाले.
तर पार्थच्या यशाने बुरोंडी-महामाई नगरची मान उंचावली, असे ग्रामस्थ जनार्दन गोवले म्हणाले. कुशाग्र बुद्धिमत्ता असलेला पार्थ शिक्षणात मोठे यश मिळवेल, असे माजी मुख्याधापिका मैथिली गोवले म्हणाल्या.