
सिंधुदुर्ग : ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी पर्यटनाच्या विविध योजना राबविणे आवश्यक आहे. चांदा ते बांदा अंतर्गत निवास न्याहारी योजनेच्या धर्तीवर प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात लाभार्थींच्या घरांचे पर्यटनदृष्ट्या नुतनीकरण, पर्यटकांसाठी निवासाची सुविधा निर्माण करता येईल. यासाठी अल्प व्याज दराने अर्थपुरवठा केला जातो. याच अनुषंगाने कोकण ग्रामीण पर्यटन योजनेखालीही ग्रामपंचायतींनी प्रस्ताव सादर करावेत. पर्यटनाच्या योजनेमुळे ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या निश्चित सक्षम होतील, असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शरद कृषि भवनात आयोजित सरपंच-ग्रामसेवकांच्या एकदिवसीय कार्यशाळेत व्यक्त केला.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत काल या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2017-18 अंतर्गत जिल्हास्तर पुरस्काराचे वितरण पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत, जि.प. सदस्य नागेंद्र परब, अतुल बंगे, स्टिम कास्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष साबळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नैसर्गिक साधन संपत्तीची मुक्त हस्ते उधळण झालेली आहे. याचा लाभ घेत ग्रामपंचायतींनी आपल्या गावात व गावच्या आसपास असलेल्या पर्यटन स्थळ, सागरी किनारे, तलाव-धरण यांचे परिसर याचा अभ्यास करुन तसेच निवास न्याहारीसाठी इच्छुक ग्रामस्थांशी चर्चा करुन प्रस्ताव पाठवावेत असे स्पष्ट करुन पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील 17 ग्रामपंचायतींना पर्यटन कर वसुलीचा परवाना देण्यात आला. यामुळे या सर्व ग्रामपंचायतींना पर्यटन कराद्वारे लाखो रुपयांचे उत्पन्नसुद्धा सुरु झाले आहे. ग्रामपंचायतींच्या उत्पन्न वाढीसाठी पर्यटनाच्या योजना निश्चित हातभार लावू शकतात यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी थोडा अभ्यास करुन प्रस्ताव पाठवावेत. आता नजिकच्या काळात चिपी विमानतळ सुरु होत आहे. याच बरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हा सुद्धा येत्या दोन वर्षात पूर्ण होईल. यामुळे सिंधुदुर्गात येणाऱ्या पर्यटकांची संख्य दुप्पट किंवा तिप्पट होईल. त्यांना निवासाची सुविधा, पर्यटकांसाठी हॉटेल्स मोठ्या संख्येने उपलब्ध असायला हवीत. याचाही ग्रामपंचायतींनी विचार करावा व आवश्यक प्रस्ताव सादर करावेत.
यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत प्रथम क्रमांक पाच लक्ष रुपये ग्रामपंचायत कुशेवाडा ता. वेंगुर्ला, द्वितीय क्रमांक तीन लक्ष रुपये ग्रामपंचायत पावणाई ता. देवगड तर तृतीय क्रमांक दोन लक्ष रुपये कोळोशी ता. कणकवली यांना प्रदान करण्यात आले, तर उत्तेजनार्थ 25 हजार रुपयांचे पारितोषिक ग्रामपंचायत नाव्हेली ता. सावंतवाडी, आयनोडे-हेवाळे ता. दोडामार्ग ग्रामपंचायत बुधवळे-कुडोपी ता. मालवण यांना प्रदान करण्यात आले.
कमलाकर रणदिवे यांनी कोकण ग्रामीण पर्यटनांतर्गत विविध योजनेची माहिती देऊन प्रस्ताव कसे पाठवावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट अखेर सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण बाबत प्ले स्टोअर मधून SAG१८ हे ॲप डाऊनलोड कसे करावे व यात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशी दयावीत या बाबत माहिती दिली. या कार्यशाळेत जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्ञानार्जन व व्यक्तिमत्व विकासाठी लोकराज्य माहितीपूर्ण व उपयुक्त : केसरकर
शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिक युवक-युवती, विद्यार्थी तसेच सर्व वाचकांच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त मासिक आहे. ज्ञानार्जन व व्यक्तीमत्व विकासाठी लोकराज्य मासिक माहितीपूर्ण व उपयुक्त आहे. लोकराज्य मासिकाचा आषाढी वारी निमित्त प्रकाशित केलेला वारी विशेषांक अनेक वाचकांपर्यंत पोहोचला. स्पर्धा परिक्षा असोत किंवा शासनाच्या विविध विकास योजनांची माहिती मिळण्यासाठी लोकराज्य मासिकाचे गाव पातळीवर वर्गणीदार करुन ग्रामपंचायतींनीं लोकराज्य ग्राम हा बहुमान मिळवावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकराज्य ग्राम झालेल्या जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना प्रशस्तीपत्रक व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शरद कृषि भवन येथे काल झालेल्या या कार्यक्रमात पालकमंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सांवत, जि.प. सदस्य नागेंद्र परब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
आयनोडे-हेवाळे ग्रामपंचायतीमार्फत सरपंच संदीप देसाई, केर भेकुर्लीच्या सरपंच सौ. मिनल देसाई व कुडासे खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. संगिता देसाई यांनी यावेळी प्रशस्तीप्रत्रक व स्मृतीचिन्ह स्वीकारले. यासर्व ग्रामपंचायती दोडामार्ग तालुक्यातील आहेत.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदिवडेकर यांनी लोकराज्य ग्राम संकल्पनेची माहिती दिली. गावातील प्रत्येक कुटुंबनिहाय लोकराज्य मासिकाची प्रत्येकी 100 रुपये भरुन लोकराज्य ग्राममध्ये सहभागी होता येईल असे स्पष्ट केले. यावेळी जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.