रत्नागिरी, (आरकेजी); परशुरामपंत अभ्यंकर विद्यांमदिरच्या विद्यार्थ्यानी आज दिव्यांच्या अमावस्येचे आपल्या आयुष्यातील महत्त्व दिव्यांच्या प्रदर्शनातून सांगण्याचा प्रयत्न केला . हे विद्यांमदिर गेली अनेक वर्षे हा प्रयत्न करत आहे. दगडांच्या घर्षणातून अग्नी निर्माण झाला. हा अग्नी वेगवेगळ्या रुपात आपण वापरतो. ही सर्व उपकरणे, दिवे आकर्षक पद्धतीने मांडून त्यांचे प्रदर्शन अभ्यंकर विद्यामंदिरात मांडण्यात आले होते. पूर्वी आदिमानव दगडांच्या घर्षणातून अग्नि निर्माण करत होता. उत्क्रांतीनंतर हाच अग्नी वेगवेगळ्या दिव्यांच्या रूपामध्ये बदलू लागला. समई, कुरवंडीचा दिवा, पंचारत, काडवाती, पिठाचे दिवे, फुलवातीचे निरांजन, पणती, त्रिपूर, कंदील, ज्ञानदीप, मशाल, बत्ती असे दिव्यांचे अनेक प्रकार या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. तसेच चार्जिंगचे बल्ब, लायटिंगच्या माळा, ट्यूबलाईट असे आधुनिक प्रकारही यात मांडण्यात आले होते. दिव्यांच्या अमावस्येला दीप पूजन महत्त्वाचे असते. त्यामुळे अलीकडे गटारी अमावस्या अशी वाईट पद्धत सर्वत्र पाहायला मिळते. त्याऐवजी शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना दिव्यांच्या अमावस्येचे व अग्निचे रूप समजावे या हेतूने हे प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात येते.
या कार्यक्रमास दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित्रा बोडस, शाळेचे व्यवस्थापक दिलीप भातडे, कार्यकारिणी सदस्य जयंत प्रभुदेसाई, मुख्याध्यापक नारकर, सहशिक्षिका, विद्यार्थी उपस्थित होते.
तसेच आनंदीबाई अभ्यंकर बालविद्यामंदिरातही विद्यार्थ्यांना दिव्यांची गोष्ट सांगून दिव्यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. मुख्याध्यापिका मीना रिसबूड यांच्या मार्गदर्शनाखाली पणत्या, मेणबत्ती, समई प्रज्वलित करून पूजन करण्यात आले. बालदोस्तांनी दिव्याला नमस्कार केला.















