रत्नागिरी : मुंबई -गोवा मार्गावरील चिपळूण जवळील परशुराम घाटात आज दरड कोसळली. सुरुवातीला काही काळ वाहतूक ठप्प होती. पण सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. पोलीस व आपत्ती व्यवस्थापनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, दरड हटविण्याचे काम सुरू होतं.
कोकणात गेले 4 दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यात मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी दरड किंवा माती येत आहे. तसेच काही ठिकाणी महामार्गावरील चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या ठेकेदारांच्या गलथान कारभाराचा फटका वाहतुकीला बसत आहे.. काही ठिकाणी मातीचा भराव रस्त्यावर वाहून येत आहे. तर काही ठिकाणी महामार्गच पाण्यात जात आहे.
दरम्यान अशीच दुर्घटना आज महामार्गावरील परशुराम घाटात घडली. घाटातील दरड थेट रस्त्यावर आली. सुदैवाने यावेळी कोणताही अपघात झाला नाही. पण वाहतूक काही वेळ ठप्प होती. सध्या एकेरी वाहतूक महामार्गावर सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर वाहन चालवताना वाहनचालकांनी सुद्धा खबरदारी घेणं आवश्यक आहे