
मुसळधार पावसामुळे घाट धोकादायक
घाटातील वाहतूक वळविण्यात आली पर्यायी मार्गे
रत्नागिरी, प्रतिनिधी
मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाटात मुसळधार पावसामुळे तीन ठिकाणी दरड कोसळली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव घाटातील वाहतूक संध्याकाळपासून बंद करण्यात आली आहे.. पर्यायी मार्ग म्हणून चिरणी- कळंबस्ते मार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट आता सतत धोक्याची घंटा देऊ लागला आहे. शनिवारी रात्री दरड कोसळल्याने घाट काही काळ वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. चौपदरीकणासाठी येथे मोठ्या प्रमाणात डोंगर कटाई करण्यात आली आहे . त्यामुळे दरडीचा धोका अधिक वाढला असून दरडीची माती दगड रस्त्यावर येण्याचे प्रकार सलग सुरू झाले आहेत. आज पुन्हा (सोमवारी) पावसाचा जोर वाढताच दरडीची माती रस्त्यावर येत असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सायंकाळी ४.३० वाजल्यापासून घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्ग म्हणून कळंबस्ते चिरणी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
रात्रभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून सकाळी पुन्हा पाहणी केल्यानंतर एकेरी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे . त्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.















