
रत्नागिरी : देशभरात परशुराम चे एकमेव देवस्थान असून त्याला पुरातन इतिहास आहे. या देऊळात देशभरातून पर्यटक येत असतात त्यामुळे पर्यटक वाढीसाठी आवश्यक त्या सुख सोयी करण्यात येत आहे. परशुराम देवस्थानातील काही काम अजून बाकी आहे ते तात्काळ पूर्ण करण्यात यावे, यासाठी आवश्यक ती निधी आपल्याला देण्यात येऊन निधीची कमी पडू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी केले.
संस्थान श्री. भार्गवराम परशुराम येथे पर्यटन विकास आराखडा अंतर्गत नुतन इमारतींच्या उद्घाटन सोहळा प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत, गोशाळा, कर्मचारी निवासस्थान इमारत, लायब्ररी व डिस्पेंसरी या इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, चिपळूण चे आमदार सदानंद चव्हाण, खेडचे उद्योजक व संस्थानचे अध्यक्ष हिराभाई बुटाला, चिपळूणचे प्रांतधिकारी कल्पना जगताप, चिपळूण चे तहसिलदार जीवन देसाई, सार्वजनिक बाधकाम चिपळूणचे कार्यकारी अभियंता उत्तमकुमा मुळे, राजू जोशी, परशुराम गावचे सरंपच गजानन कदम, पेढे गावचे सरंपच प्रवीण पाकळे, प्रशांत पटवर्धन, विलास चाळके,सचीन कदम जीवन रेळकर आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले नाना जोशींकडे ध्येय , दुरदृष्टी होती आणि त्या दुरदृष्टीतून हे मंदीराच्या विकासाची कामे करण्यात आली आहे. विकासाची कामे ही झालीच पाहिजे. रत्नागिरी जिल्हयाचा पर्यटनाच्या दृष्टिने विकास करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येवून काम करणे गरजेच आहे. पर्यटन वाढीसाठी आपल्या मागणीनुसार आवश्यक तेथे निधी उपलब्ध करुन देत असतो.
आपल्याकडून सांगण्यात आलेले परशुराम देवस्थांनासंदर्भातील सर्व कामे आपण वैशिष्टपूर्ण निधीतून करु. राहिलेल्या कामांचा प्लॅन करा. त्या प्लॅननुसार आपण सर्व कामे करण्यासाठी कटिबध्द आहोत, असेही ते म्हणाले. सध्या परशुराम देवस्थान येथे तात्काळ करावी लागणाऱ्या कामासाठी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी नाविण्यपूर्ण योजनेंतून ५० लाख निधी देण्याचे आश्वासित केले.
यावेळी परशुराम गावातील नागरिक, लोकप्रतिनिधी मोठया संख्येन उपस्थित होते.
















