नवी दिल्ली : जागतिक जैवइंधन दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “परिवेष” या पर्यावरणीय एकल खिडकी केंद्राचा प्रारंभ केला. “परिवेष” ही एकल खिडकी एकात्मिक पर्यावरण व्यवस्थापन यंत्रणा असून ती https://parivesh.nic.in. वर उपलब्ध आहे.
केंद्र, राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या विविध मंजुरींसाठी प्रकल्पांकडून ऑनलाईन प्रस्तावांचे सादरीकरण, देखरेख आणि व्यवस्थापनासाठी ती आहे. सर्व प्रकारच्या मंजुरीसाठी (पर्यावरण, वने, वन्यजीवन आणि सीआरझेड) एकल नोंदणी आणि सिंगल साइन इन हे “परिवेष” चे वैशिष्ट्य असल्याचे केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री हर्षवर्धन यांनी ट्विटरवर म्हटले आहे. “परिवेष” मुळे ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून आर्थिक विकासासाठी आराखडा उपलब्ध व्हायला आणि शाश्वत विकासाला बळकटी मिळायला चालना मिळेल, असे हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.