रत्नागिरी, प्रतिनिधी :- रत्नागिरी- सिंधुदुर्गातील जन शिक्षण संस्थान व पुणे विमान प्राधिकरणतर्फे जिल्ह्यातील एक हजार महिलांना शिलाई मशीन आणि सायकल बँक अंतर्गत 100 शाळांतील एक हजार मुलींना सायकलचे वितरण करण्यात आले. टीआरपी येथील अंबर हॉलमध्य हा कार्यक्रम पार पडला. माजी मंत्री सुरेश प्रभू, सौ. उमा प्रभू यांनी वेबिनारद्वारे यात भाग घेतला होता. दरम्यान, जन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद सावंत यांनी ऑनलाइन कार्यक्रमाबाबत मार्गदर्शन केले.
रत्नागिरी- सिंधुदुर्गमध्ये माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नेतृत्वाखाली जन शिक्षण संस्थेने 25 वर्षांत कायापालट केला. आता रत्नागिरीतही लवकरच जन शिक्षण संस्थान सुरू होणार आहे. त्यातून जिल्ह्यात नक्कीच परिवर्तन सुरू होईल. कोकणात याद्वारे रचनात्मक काम उभे राहील. अनुभवसंपन्न सुरेश प्रभू यांचे खर्या अर्थाने कोकणाकडे लक्ष आहे. माझं कोकण व इथल्या नागरिकांमध्ये परिवर्तन होण्यासाठी प्रभूंची तळमळ असते. अशा संस्थांमुळेच रत्नागिरी जिल्ह्याचा शाश्वत विकास होणार आहे, असे प्रतिपादन भाजप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
यावेळी वेबिनारद्वारे दिल्लीमधून सुरेश प्रभू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक माणसाचा, घराचा, जिल्हा, राज्याचा विकास व्हायला हवा. शेतकरी, मच्छीमार, महिला, तरुण, लहान व्यापारी, मागासवर्गीय या सर्वांचा विकास हवा. नोकर्या मागणारे नव्हे तर नोकरी देणारे तयार झाले पाहिजे.
मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्ष उमा प्रभू म्हणाल्या की, शिलाई मशीनच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहणार आहेत. जन शिक्षण संस्थान ही देशातली पहिली संस्था. शिक्षण संस्था सिंधुदुर्ग येथे सुरेश प्रभू यांनी सुरू केली. एखाद्याला मासे खायला देण्यापेक्षा मासे पकडायला शिकवले या पाहिजे, असे प्रभू सांगतात.
माजी आमदार बाळ माने यांनी समारोपाच्या भाषणात सांगितले, 2021 मध्ये पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे नवभारतासाठी सर्वांनी सज्ज व्हा. परिवर्तन केंद्राची भूमिका महत्त्वाची असून त्यासाठी प्रत्येकाने योगदान द्या. या वेळी राजू सावंत, निशिकांत भोजने, नाबार्डच्या श्रद्धा हजीरनिज, बबनराव पटवर्धन, विजय केनवडेकर, रवींद्र वाडेकर व महेश गर्दे आदी उपस्थित होते. सुधीर पालव यांनी सूत्रसंचालन केले.