
मुंबई : परळ येथील हाफकीन परिसरातील साई मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हाफकीन प्रशासनाने संरक्षक भिंत टाकली आहे. यामुळे भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. संरक्षक भिंतीमुळे भाविक आणि सेवेकऱ्यांचा रस्ता रोखला गेला आहे. 40 वर्षे जुने साई मंदिर बंदिवासात गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईतल्या अनेक भागातून दरवर्षी साई पालखीच्या पदयात्रा निघतात. त्यापैकी परळच्या हाफकीन वसाहतीतील सिद्धीसाई दिंडी संस्थेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. 40 वर्षे हजारो साईभक्त या मंदिराशी जोडले गेले आहेत. संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी व्यसनमुक्तीचा संदेश देत भक्ती भावाबरोबर जनजागृती केली जाते. येथील जुन्या कर्मचारी आणि काही भक्त मंडळींनी चाळीस वर्षांपूर्वी हाफकिन वसाहतीत साई मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. आजमितीस या वसाहतीतील साई मंदिरात रोज शेकडो भक्तांची ये जा असते. या मंदिराच्या देखभालीसाठी कार्यरत असलेल्या सिद्धी साई दिंडी संस्थेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती उपक्रमाबरोबर अनेक सेवाभावी कार्य अद्याप सुरू आहे ते भाविकांच्या पाठबळावर आणि साईंच्या आशीर्वादावर. हाफकीन प्रशासनाने हजारोंचे श्रध्दास्थान असलेल्या साई मंदिराकडे येणारी वाट रोखली.
हाफकीनचा 5 एकर भाग राज्य सरकारने टाटा हॉस्पिटलला देण्याचा निर्णय याआधी घेतला आहे. त्यात मंदिराची जागा ही टाटांच्या हद्दीत मोडत आहे. टाटा हॉस्पिटल प्रशासननेही रुग्णासाठी मोठी इमारत उभारताना अनेकांचे श्रध्दास्थान असल्याने साई मंदिराचा भाग सोडून बांधकाम केले आहे, ही मोठी जमेची बाजू आहे. मात्र या मंदिरात येणाऱ्या साई भक्तांना नव्या आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. संरक्षक भिंतीच्या नावाखाली हाफकीन प्रशासनाने नेहमीच्या वहिवाटीने साईंच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांचा मार्ग रोखला आहे. त्यामुळे पहाटेची काकड आरती, संध्याकाळची आरती आणि रात्रीची शेजारती या नित्यपूजेसाठी गेले अनेक वर्षे येणाऱ्या भाविकांचे दरवाजे संरक्षक भिंतीमुळे बंद झाले आहेत .
या ठिकाणी प्रवेशद्वार असावे अशी साधी मागणी मंडळाने आणि स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी हाफकीन प्रशासनाकडे केली होती. मात्र,सर्पालयाच्या एका प्रकल्पाचे कारण दाखवून साई मंदिराकडे जाणारा छोटासा रस्ता बंद केल्याचे बोलले जाते. समाजाच्या हितासाठी एखादा प्रकल्प हाफकिन संस्था राबवित असेल तर त्याचे मंडळाकडून स्वागतच करण्याची भूमिका मांडण्यात आली होती. हाफकिन संस्थेला इतरही प्रवेशद्वार आहेत. परंतु या भिंतीमुळे मंदिराचे प्रवेशद्वार बंद झाले आहे. त्यातून साई मंदिराचे भाविकांचे इतक्या वर्षांचे भावनिक नाते तोडण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप साई भक्त करत आहेत. साई भक्तांना दर्शनाचा नित्य लाभ घेता येत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. आता साईबाबांच्या दर्शनाचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाविकांनी एकत्र येऊन आता सनदशीर मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
साई मंदिर प्रवेशद्वार खुले न केल्यास उपोषणाचा इशारा
हाफकीन प्रशासनाने भाविकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. त्या ठिकाणची अनावश्यक संरक्षक भिंत हटवून साई मंदिराचा मार्ग लवकरात लवकर मोकळा करावा. अन्यथा सनदशीर मार्गाने आंदोलने करावी लागतील. शेवटचा पर्याय म्हणून आमरण उपोषणाला बसण्याची आमची तयारी आहे
-दिपक नलावडे , सिद्धी साई दिंडी भक्त परिवार ( समन्वयक)














