
रत्नागिरी, (आरकेजी) : वर्षभरापूर्वी बांधकाम काम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या परचुरी- कोळंबे पुलाचे अखेर आज उदघाटन झाले. संगमेश्वर तालुक्यातील परचुरी गावातील बावनदीवर पूल बांधण्यात आला आहे. खासदार विनायक राऊत यांनी पुलाचे उदघाटन केले. आमदार उदय सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, जि.प अध्यक्षा स्नेहा सावंत, उपाध्यक्ष संतोष थेराडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
काही वर्षापासून परचुरी ग्रामस्थांचा पुलासाठी लढा सुरु होता. पावसाळ्यादरम्यान येथील अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे दळणवळणासह अनेक पायाभूत समस्यांना येथील ग्रामस्थांना वारंवार तोंड द्यावे लागत होते. येथे पूल व्हावा, अशी परचुरी ग्रामस्थांची मागणी केली होती. १२ कोटी रुपये खर्चून पूल बांधण्यात आला आहे. वर्षभर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या पुलाचे अखेर आज उद्घाटन झाले.
पुलामुळे परचुरी गावासह पोचरी, कुंरधुडा, मांजरे, फुणगूस, कोंडये, वांद्री तसेच इतर गावासह अनेक वाडयांना फायदा होणार आहे.
परचुरी-देवरुख अशी एस टी सेवाही सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी महामार्गावर येण्यासाठी या गावातील लोकांना ३० ते ३५ किमीचा वळसा घालून यावे लागत होते किंवा नदीपत्रातून होडीद्वारे प्रवास करावा लागत होता. आता पुलामुळे ग्रामस्थांचा प्रवास सुकर होणार आहे.