
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील आंबेडकर सभागृहात पर्यावरणपूरक मखरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून गणेशभक्तांनी प्रदर्शन पाहण्यास मोठी गर्दी केली आहे. जेष्ठ पत्रकार बापू वैद्य यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करणात आले.
आंबेडकर सभागृहात मंगळवार दिनांक 4 सप्टेंबर, 2018 पासून सुरू झालेल्या पर्यावरण पूरक गणेश प्रदर्शनात पुठ्ठ्यापासून बनविण्यात आलेली मखरे ठेवण्यात आली आहेत. गणपतीची आभूषणे, गौरीची आभूषणे, गौरीच्या वेण्या, आंबाडा, घुप, वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्या, पूजेचे साहित्य मांडण्यात आले आहे. सदर प्रदर्शन 13 सप्टेंबर पर्यंत सर्वांसाठी खुले आहे. याबाबत बोलताना पर्यावरण स्नेही अमित जळवी यांनी सांगितले कि, गेली पाच वर्षे अशा प्रकारचे प्रदर्शन भरवत असून या प्रकारच्या मखरांना चांगली मागणी आहे. परंतु आजही थर्माकोल मखरांना मागणी आहे. कारण पुठ्याचे किंवा कागदाचे मखर पडेल, मोडेल असा समज आहे. थर्माकोल मखरांचा थिकनेस जास्त असल्याने ती पक्की असतात व हलत नाहीत असे वाटते. पुठ्याचा आणि कागदाच्या माखारांचा प्रकार अजून समजायला वेळ लागेल. मागणी कमी असल्याने पुरवठाही कमी आहे. पण डोंबिवलीत अशा पर्यावरण पूरक मखरांना चांगली मागणी आहे. या प्रदर्शनात ठेवण्यात आलेली पर्यावरण पूरक मखरे सुमारे 400 ते 2500 किंमतीची आहेत. थर्माकोलची मखरे स्वस्त असतात कारण ती मोठ्या संख्येने तयार केली जातात. पुठ्याची किंवा कागदाची मखरे कमी प्रमाणात तयार होतात. त्यांनी पुढे सांगितले कि, या प्रदर्शनात पुठ्याची तसेच कागदाची ओमकार आसन, सिशुळ आसन, चौरंग आसन, राऊंड आसन, जास्वंद, सूर्यमंदिर, शीशमहल, फ्लॉवर आसन, नंदी आसन, महाराजा आसन, मंदीर आसन, मयूर आसन अशा विविध प्रकारची मखरे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत.