
यावर्षीचं हवामान आंब्याला पोषक नाही
याबाबत बोलताना ज्येष्ठ आंबा उत्पादक शेतकरी आनंद देसाई म्हणाले की, यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासूनच नैसर्गिक आपत्तीचा सामना आंब्याला करावा लागला. सुरुवातीला तुडतुड्याने पालविवर प्रादुर्भाव केला. त्यामुळे पालवीवर औषध फवारणीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला. त्यानंतर 3 ते 4 वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात यावर्षी थंडी म्हणावी तशी पडली नाही, तर दोन वेळा 40 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान वाढलं. त्यामुळे आंब्याला जे पोषण हवामान लागतं, ते हवामान या हंगामात अजिबात पोषक नाही, त्यामुळे यावर्षी आंब्याचं पीक धोक्यात आलेलं आहे. यावर्षी फक्त 25 ते 30 टक्केच आंबा आहे. पण जिथे आंबा आहे तिथे आहे, जिथे नाही तिथे काहीच नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे यावर्षी आंबा नाही त्यांचं तर मोठं नुकसान झालं असल्याचं देसाई यांनी यावेळी सांगितलं.
आंब्याचे सध्याचे दर
यावर्षी आंबा कमी असल्याने त्याचा दरावरही परिणाम झालेला आहे. आंब्याचे सध्याचे दर डझनला 700 रु. ते अगदी 1200 रुपये एवढे आहेत. बाहेरील राज्यातील आंब्याची आवक वाढल्याने कोकणातील आंब्याचे दर कमी झाले असल्याचं यावेळी आनंद देसाई यांनी सांगितलं.
कोकणातील हापूस कसा ओळखावा
सध्या बाजारात बाहेरील राज्यातीलही आंबा दाखल झालेला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा खरेदी करायला गेलेल्या ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोकणातील हापूस नेमका कसा ओळखावा याबाबत बोलताना आनंद देसाई म्हणाले की,
कोकणातील पिकलेला हापूस हा आतून केशरी रंगाचा असतो, कर्नाटकचा आंबा आतून पिवळ्या रंगाचा असतो. हापूसला चांगला वास येतो, मात्र कर्नाटकी आंब्याला अजिबात वास येत नाही. चवीमध्ये देखील फरक असतो. कोकणातील आंबा प्रचंड गोड असतो त्यात साखर जास्त असते. कर्नाटकी आंबा फार गोड नसतो. कोकणातील हापूसचा कलर हा बॉटल ग्रीन असतो, बाहेरील राज्यातील आंबा हा पेल ग्रीन असतो. कोकणातील हापूसचा रस हा घट्ट असतो, तर कर्नाटकी आंब्याचा रस हा पातळ असतो, या आंब्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं. तसेच कोकणातील हापूसची साल ही पातळ असते, तर बाहेरील राज्यातील आंब्याची साल जाड असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांनी दुकानातून किंवा मार्केटमधून आंबा खरेदी करताना विक्रेत्याने जीआय मानांकनाचं प्रमाणपत्र घेतलं आहे का ते विचारावं. ते जर प्रमाणपत्र त्यांच्याकडे असेल तर त्यांनाच फक्त अल्फान्सो आणि हापूस हे शब्द वापरायला परवानगी आहे. कोकणातील जे 5 जिल्हे आहेत त्यांनाच फक्त हापूस आणि अल्फान्सो हे शब्द वापरता येणार असल्याचं आनंद देसाई यांनी यावेळी सांगितलं.