रत्नागिरी : कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल रत्नागिरीतील प्रसिध्द परांजपे अॅग्रो प्रोडक्टस् या कंपनीला राज्याच्या ग्रामीण भागातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. ऋषिकेश परांजपे आणि समृध्दी परांजपे या जोडप्याने मुंबईतील जास्त पगाराच्या नोकर्या सोडून गावी परत येऊन काजू क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान आहे.
आडिवरे या गावापासून काजू प्रक्रिया उद्योग उभा करणार्या ऋषिकेश परांजपे आणि त्यांच्या या धाडसी निर्णयाला सर्वार्थाने साथ देणारी त्यांची पत्नी समृध्दी यांनी महानगरातील सुखी जीवनाला पाठ करत गावी येऊन काजू सारख्या दुर्लक्षित क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. कोकण जरी आंबा, काजू साठी प्रसिध्द असले तरीही हा कच्चा माल मिळवण्यापासून कंपनी स्थापन करण्यासाठी भांडवल मिळवण्यापर्यंत अनेक बाबतीत या दाम्पत्याने खूप मोठा संघर्ष केला आहे. वाटेत येणार्या प्रत्येक अडचणींचा सामना करत दोघांनीही आडिवरे येथून आपली कंपनी मिरजोळे येथील एमआयडीसी येथे हलविली आणि कार्यकक्षा अधिक विस्तारली. त्यांच्या प्रयत्नांना याच वर्षी यश आले आणि त्यांचा पहिला काजू कंटेनर यूएसए न्यू जर्सी येथे निर्यात झाला. रत्नागिरीसारख्या ग्रामीण भागातून हि निर्यात होणे हि एक मोठी आणि महत्त्वाची पायरी होती.
त्यांच्या याच कार्याची दखल मुंबई दूरदर्शन केंद्राकडून घेण्यात आली. राज्यातील प्रगतीशील शेतकरी, कृषी संस्था, संशोधक यांना मुंबई दूरदर्शन केंद्राच्या सह्याद्री वाहिनीच्या वतीने गेली अकरा वर्षे ‘दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. या वर्षीचा ‘१२ वा दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान – २०१९’ पुरस्कारांअंतर्गत ‘ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्य’ या क्षेत्रासाठी निवड समितीने परांजपे अॅग्रो प्रोडक्टस्ची निवड केली आहे.
यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दि. ३ जुलै २०१९ रोजी दुपारी ३ ते ५.३० वाजता या वेळेत मुंबई दूरदर्शन केंद्राच्या ए-१ स्टुडिओत होणार आहे.