रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी) : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानातंर्गत करण्यात आलेल्या कामामुळे शेतीला मुबलक पाणी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत आहे. हा प्रकल्प इतरही राज्यांनी राबवावा अशा सूचना केंद्र सरकारमार्फत देण्यात आल्या असून राजस्थान राज्याने जलयुक्त शिवार अभियान त्यांच्या राज्यात राबविण्यास सुरुवात केली असून इतरही राज्य या अभियानाचे अनुकरण करीत असून तेही हा प्रकल्प त्यांच्या राज्यात राबवतील असे ग्रामविकास व महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
लोकनेते गोपनाथजी मुंडे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचे उद्घाटन मंडणगड येथे मुंडे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. गावाचा विकास होण्यासाठी गावामध्ये रस्ते असणे आवश्यक असून त्यामुळे राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरु केली असून येत्या काळात तीस हजार किलोमीटर ग्रामीण पातळीवर रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत या योजनेतंर्गत अडीच हजार किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून येत्या काळात उर्वरित रस्त्यांची कामेही पूर्ण होणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मत्स्यबीज रत्नागिरीत जिल्ह्यात उत्पादित होणार : जानकर
पशुसंवर्धन दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेवराव जानकर यांनी सांगितले की, राज्यामध्ये यापूर्वी मत्स्यबीज इतर राज्यातून घ्यावे लागत होते ते आता रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादित करण्यात येणार आहे त्यामुळे मत्स्यव्यवसाय नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. दुग्ध उत्पादनासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून दुग्धव्यवसायी यांना प्रोत्साहन देत असून येत्या काळात दुधाच्या बाबतीत राज्य पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी नॅशनल कमिशन फॉर डि नोटीफाईड नोमेडीक अँड सेमी नोमेडीक ट्राईब (एन.सी.डी.एन.टी) चे अध्यक्ष भिकू रामजी इदाते, जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्य व स्थानिक नागरिक उपस्थित होते