ठाणे : विद्यार्थी म्हणून जातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा, गरीब आईबापांच्या कष्टाचं चीज करण्यासाठी शिका`असे भावनिक उद्गार काढत महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी किन्हवलीतील शेकडो विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
14 वर्षांपूर्वी किन्हवलीसारख्या अतिदुर्गम भागात विद्या प्रसारक मंडळाने सुरू केलेल्या कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या १४ व्या वर्धापनदिनानिमित्त स्व.गोपीनाथ मुंडे सभागृहात आयोजित सोहळ्यात त्या बोलत होत्या.
नॅकचे मानांकन प्राप्त झालेल्या किन्हवली महाविद्यालयाच्या `डिजिटल इंडिया विद्यादीप` या वार्षिक अंकाचे प्रकाशन यावेळी त्यांच्या हस्ते झाले. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, शहापूरचे आमदार पांडुरंग बरोरा, मुरबाडचे आमदार किसन कथोरे,आदिवासी विभागीय प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष अशोक इरनक,विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरविंद भानुशाली यांची यावेळी उपस्थिती होती.
याप्रसंगी शहापूरच्या ग्रामीण भागातील रस्ते येत्या पावसाळ्यापूर्वी सुस्थितित करण्याचे आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे तसेच नवनिर्वाचित जि.प.सदस्य राजू विशे, काशिनाथ पष्टे, कांचन साबळे,पंचायत समिती सदस्य सुभाष हरड,काशिनाथ वाघ, दिपक पवार,पुष्पाताई बांगर, शारदा रसाळ, दक्षता लकडे, यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अरविंद भानुशाली यांनी किन्हवली परिसरातील आव्हानांचा उल्लेख केला व या भागाकडे अधिक लक्ष्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नलावडे यांनी, तर सूत्रसंचालन गोपाळ वेखंडे, लक्ष्मण उमवणे यांनी केले.