रत्नागिर : 15 डिसेंबर पर्यंत पाणीटंचाईचे आराखडे तयार करुन ते पंचायत समितीकडे पाठवावेत आणि 15 जानेवारीपर्यंत त्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी घ्यावी, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात रत्नागिरी तालुका पाणीटंचाई आढावा बैठक तसेच अमृत महा आवास अभियान 2022-23 पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, राजेश सावंत आदींसह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, 15 जानेवारीच्या आत जिल्हाधिकाऱ्यांकडून पाणी टंचाईच्या आराखडांना मंजुरी मिळाली पाहिजे. त्याची जबाबदारी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी घ्यावी. त्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवकांनी 15 डिसेंबरपर्यंत पंचायत समितीकडे प्रस्ताव द्यावेत. जलजीवन मिशन योजनेंतर्गत कामे मार्गी लावावीत. या कामांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुकानिहाय बैठक घ्यावी. जलजीवन मिशन बाबत हलगर्जी झाली तर, ग्रामसेवकांना जबाबदार धरले जाईल. पाणी टंचाईबाबत ग्रामसेवकांची मानसिकता सकारात्मक हवी.
यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट घरकुल, उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट क्लस्टर, राज्य पुरस्कृत आवास योजना, राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, राज्य पुरस्कृत सर्वोत्कृष्ट क्लस्टर पुरस्कार विजेत्यांना वितरण करण्यात आले.