मुंबई : पाणी टंचाईच्या काळात ९९६ गावे, वाड्या आणि वस्त्यांसाठी पाणी टंचाई निवारणासाठी ३ कोटी ६९ लक्ष किंमतीचा आराखडा आणि ५१२ वाड्या – वस्त्यांसाठी २ कोटी ५६ लक्ष असे एकूण 1476 वाड्या-वस्त्यांसाठी 6 कोटी 25 लक्ष किंमतीच्या टंचाई आराखड्यान्वये संबंधित गावात पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत दिली.
रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईसंदर्भात सदस्य विकास कुंभारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सदस्य प्रशांत ठाकुर यांनी उप्रपश्न उपस्थित केला होता.
लोणीकर म्हणाले, जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून त्यामध्ये नवीन विंधन विहिरी घेणे व टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे या उपायायोजना मार्च २०१७ ते जून २०१७ या कालावधीत राबविण्यात आल्या होत्या. राष्टीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१६-१७ मध्ये ३८ गाव-वाड्यांमध्ये १४ पाणीपुरवठा योजना चालू आहेत. तर २०१७-१८ या आर्थित वर्षात रायगड जिल्ह्यातील ४५ गावे – वाड्यांमध्ये ४५ पाणी पुरवठा योजना राबविण्यांकरिता कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ६ तालुक्यात १२ नळ पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केल्या असून, त्यापैकी 8 योजनांना शासन स्तरावरील तांत्रिक समितीने मान्यता दिली असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.