मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) : समाजात विविध क्षेत्रांत लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत.या संघटना एका विशिष्ट हेतूने काम करते यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींत सापडलेल्यांना अनेक प्रकारे साहाय्य करतात. अन्नधान्य , कपडे , गृहोपयोगी वस्तू , औषधे , वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात. यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणेतसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळ गेली अनेक वर्षे निस्वार्थी पणे करीत आहे.समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आर.सी.एफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड खजिनदार सचिन साळूंखे , उपाध्यक्ष रमेश पाटील,सहसचिव वैभव घरत , सल्लागार हनुमंता चव्हाण, सर्व महिला -पुरुष कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड व परिसरात आपल्या कार्याचे जाळे विणणाऱ्या पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) यांच्या माध्यमातून ३१ जानेवारी रोजी तुर्भे अप्पर प्रायमरी म्युनिसिपल शाळेतील मुलांसाठी विनामूल्य वैद्यकीय चिकित्सा शिबिराचे आयोजन करुन यावेळी त्यांना स्वच्छता किट तसेच औषधे, खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी विचारमंचावर राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझरचे कार्यकारी संचालक (प्रोजेवट) अजय पाटील, महाव्यवस्थापक (वाणिज्य) निरंजन सोनक, पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक भोईर, सचिव प्रदीप गावंड, दै. ‘आपलं नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत, तसेच डॉ. विनित गायकवाड, डॉ रजनिश कुमार, डॉ, निलेश कांबळे, विनायक जोशी आदि उपस्थित होते.
यावेळी केलेल्या भाषणात अजय पाटील यांनी शाळकरी मुलांना शिस्त, आरोग्य पालनाचे महत्व समजावून सांगितले व अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन शाळेचे, समाजाचे, देशाचे नाव उंचावण्याचा सल्ला दिला. निरंजन सोनक यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना त्यांना व्यायाम, आहार-विहार हेही आपल्या जीवनात तेवढेच महत्वाचे असून एक ना एक दिवस तुम्हीही विचारमंचावरुन आपापले मनोगत मांडण्याइतके मोठे व्हा अशा शुभेच्छा दिल्या. ‘आपलं नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी यावेळी पंचरत्न मित्र मंडळाच्या सामाजिक कामाची प्रशंसा केली व आरसीएफ चे व्यवस्थापन आणि या मंडळाला मदत करणारे सर्वच प्रायोजक, दानशूर दाते हे नेहमीच पूर्ण ताकदीनिशी सहकार्य करुन मोठे सामाजिक दायित्व निभावत असल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खान यांनी सदर उपक्रमासाठी सहकार्य केले. सूत्रसंचालनाची भुमिका सौ.स्नेहा नानिवडेकर यांनी पार पाडली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रमेश पाटील, सचिन साळुंखे, वैभव घरत, हनुमंत चव्हाण यांच्यासह पंचरत्न मित्र मंडळच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.