मुंबई : पंचगंगेच्या पातळीत 2 फुटांनी घट झाली असून ही दिलासा देणारी बाब आहे. एकूण 239 गावांमधून 23 हजार889 कुटुंबातील 1 लाख 11 हजार 365 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाडमधील अडकलेल्या 24 जणांना बाहेर काढण्यात आले. तसेच आंबेवाडीमधील 99 टक्के तर प्रयाग चिखली मधील 85 टक्के कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
तालुकानिहाय कुटुंब आणि सदस्य संख्या पुढीलप्रमाणे – कागल – 25 गावातील 1 हजार 73 कुटुंबातील 5 हजार 542 सदस्य,राधानगरी – 17 गावातील 558 कुटुंबातील 3 हजार 40 सदस्य, गडहिंग्लज – 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा– 22 गावातील 87 कुटुंबातील 333 सदस्य, भुदरगड – 14 गावातील 257 कुटुंबातील 1 हजार 31 सदस्य, शाहुवाडी – 6 गावातील 123कुटुंबातील 489 सदस्य, पन्हाळा – 28 गावातील 405 कुटुंबातील 1 हजार 833 सदस्य, शिरोळ – 42 गावातील 8 हजार 211 कुटुंबातील39 हजार 550 सदस्य, हातकणंगले – 21 गावातील 4 हजार 484 कुटुंबातील 21 हजार 122 सदस्य, करवीर – 35 गावातील 5 हजार 40कुटुंबातील 23 हजार 317 सदस्य, गगनबावडा– 2 गावातील 50 कुटुंबातील 241 सदस्य, चंदगड – 11 गावातील 96 कुटुंबातील 516सदस्य तर महापालिकेच्या माध्यमातून 2 हजार 569 कुटुंबातील 10 हजार 348 जणांचे स्थलांतर करण्यात आले.
पंचगंगेच्या पाणी पातळीत 2 फुटांनी घट झाली ही अत्यंत दिलासा देणारी बाब आहे. सध्या 53.5 फूट इतकी पातळी झाल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, शिरोळ तालुक्यामध्ये 30 बोटी पाठविण्यात आल्या असून उद्या 151 शिबीरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आज सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली. पाणी पातळी आणखी कमी झाल्यानंतर या गावांमध्ये हा पुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पाणी ओसरल्यानंतर पडझड झालेल्या घरांचे, जनावरांचे पंचनामे करण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे. वीज जोडणी करणे, पाणी पुरवठा करणे, जनावरांना चारा पुरवठा करणे याचाही समावेश आहे.
आजअखेर आपल्याकडे 69 हजार लिटर पेट्रोल, 31 हजार लिटर डिझेलचा राखीव साठा करण्यात आला आहे. हा साठा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेल्या वाहनांसाठी केला जात आहे. नागरिकांना इंधनाची कमतरता भासू नये यासाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. दोन दिवसांमध्ये महामार्गावरील पाणी कमी झाल्यानंतर लागलीच इंधन पुरवठा करावा अशा सूचना दिल्या आहेत. पाणी कमी न झाल्यास हवाई मार्गाने इंधन आणण्यात येईल त्याबाबत तसा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. एलपीजी सिलिंडर पुरवठ्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे. महामार्ग सुरु झाल्यानंतर तात्काळ नागरिकांना उपलब्ध होतील असे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मोबाईल सेवा कोलमडल्या आहेत त्याबाबतही कंपन्यांना पत्र दिले आहे. ते ही सुरळीत सुरु होईल. प्राथमिक माहितीनुसार 2 लाख घरांमध्ये विद्युत पुरवठाही बंद आहे. जवळपास 400 पाणी पुरवठा योजना बंद आहेत. याबाबतही सूचना देण्यात आल्या असून त्या ही पूर्ववत होतील. असेही ते म्हणाले.