
शिमगोत्सवाबाबत नव्याने काढलेल्या आदेशानुसार हे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाचे पार्श्वभूमीवर काही नियम पळून पालख्या घरोघरी येतील असे आदेश देऊन यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी भाविकांना दिलासा दिला होता. मात्र ते आदेश जिल्हाधिकारी यांनी रद्द केले आहेत.
नव्या आदेशात म्हटलं आहे की, होळी, शिमगा हा सण संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठया उत्साहाने साजरा केला जातो. या वर्षी दिनांक 28/03/2021 रोजी होळीचा सण आहे . कोव्हीड 19 चा वाढता प्रादुर्भाव पहाता कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन करुन हा सण साधेपणाने साजरा करावा. तसेच दिनांक 29/03/2021 रोजी धुलिवंदन व 02/04/2021 रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत . दरवर्षी या सणानिमिताने एकमेकांवर रंग टाकणे , पाणी टाकणे , एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करण्यात येत असते, परंतू कोव्हीड -19 चा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी धुलिवंदन व रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जनजागृती करणे आवश्यक राहील. होळी/शिमगा निमिताने खास करुन कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते, परंतु यावर्षी पालखी घरोघरी न नेता मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल या करीता स्थानिक प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घेण्यात यावी असे आदेशात म्हटले आहे.