शिवसेनेत दाखल झालेल्या मनसेतील सहा नगरसेवकांमुळे पालिकेतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसेने या नगरसेवकांची कोंडी करण्यासाठी कोकण आयुक्तांकडे याचिका दाखल केली. तसेच त्यांना पालिकेतील कोणत्याही समित्यांच्या बैठकांमध्ये प्रवेश देऊ नये शिवाय त्यांना कोणत्याही प्रस्तावावर मतदान करण्यापासून रोखावे. तसेच त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणीही मनसेने केली आहे. त्यामुळे मनसेची कोंडी झाली आहे. अद्याप पालिका सभागृहात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. कोकण आयुक्तांचे पत्र आल्यानंतर याबाबतच्या घडामोडीना आता वेग येणार आहे. गुरुवारी संध्याकाळी कोकण आयुक्तांचे या सहाही नगरसेवकांना याबाबतचे पत्र पालिकेकडे आले. शुक्रवारी संध्याकाळी हे पत्र पालिकेच्या चिटणीस विभागाने या सहाही नगरसेवकांना पाठवले आहे. या नगरसेवकांविरोधात याचिकाही या पत्राला जोडण्यात आल्या असून त्याबाबत लेखी उत्तर घेऊन कोकण आयुक्तांकडे या नगरसेवकांना प्रत्यक्ष हजर राहून सादर करावे लागणार आहे. दरम्यान शनिवारी, रविवारी सुट्टी असल्याने आता सोमवारी याबाबतचा खुलासा नगरसेवकांकडून केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या सहाही नगरसेवकांबाबतचा निर्णय स्पष्ट होणार आहे.
गटनेता पदावर तुर्डे यांची नियुक्ती करावी, राज ठाकरेंचे पत्र
मनसेत उरलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांना गटनेते म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र शुक्रवारी राज ठाकरे यांनी पालिका प्रशासनाकडे पाठवले आहे. पक्षाने केलेल्या नियुक्तीनंतर प्रशासनाला तसे सभागृहात जाहीर करावे लागते. पक्षात एकापेक्षा अधिक नगरसेवक असेल तरच गटनेता म्हणून नियुक्ती करता येते, असा पालिकेचा अधिनियम आहे. यापूर्वी मनोज संसारे यांनी एका अपक्ष नगरसेवकाला सोबत घेऊन गटस्थापन केला होता व त्याला कोकण आयुक्तांने मंजुरी दिली होती. मात्र आता मनसेचा एकमेव नगरसेवक उरल्याने त्यांना हा नियम लागू होतो का, या तांत्रिक बाबींचा विचार करून तसेच विधी विभागाच्या सल्ल्यानुसार याबाबत निर्णय घ्यावा लागेल, असे चिटणीस विभागाने सांगितले.