मुंबई, (निसार अली) : मालवणी गेट क्रमांक १ जवळ तब्बल ३८ वर्षांपासून असणारा पादत्राणे विक्री आणि शिवण्याचा स्टॉल बेकायदा आहे, असे म्हणत पालिकेने तो हटविला. पालिकेच्या या कारवाईमुळे ६२ वर्षीय सरस्वती शिंदे या हातावर पोट असणार्या महिलेवर उपासमारीची वेळ आली आहे. एकिकडे हजारो फेरिवाल्यांना अभय देणार्या पालिकेने मालवणीत १९७९ पासून स्टॉल चालवणार्या शिंदे यांना अजब न्याय लावला आहे.
सरस्वती या चप्पल शिवणे आणि विकणे हा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करत होत्या. याआधी त्यांचा दिवंगत मुलगा १९९८ पर्यंत येथे व्यवसाय करत होता. परंतु पालिकेने मात्र त्यांच्यावर कारवाई केली आहे.
शिंदे यांच्या शेजारी भालचंद्र केलवलकर यांचा वृत्तपत्रांचा स्टॉल 1990 पासून आहे. यावरही अनधिकृत आहे असे म्हणत पालिकेने कारवाई केली आहे. इतकी वर्षे एकाच ठिकाणी व्यवसाय करणार्यांवर पालिकेने कारवाई करणेच चुकीचे आहे, ३८ वर्षांचा स्टॉल अनधिकृत कसा? असा प्रश्नच परिसरातील अनेक नागरिकांनी व्यक्त केला आहे.