मुंबई : उकीरडा आणि सांडपाण्यातून वाट काढत पिण्याच्या पाण्यापर्यंत पोहोचणार्या विद्यार्थ्यांची ससेहोलपट आता थांबणार आहे. मालाडच्या मालवणी टाऊनशिप मराठी शाळेच्या आवारात हा प्रकार घडत होता. त्यासाठी कारणीभूत असणारे शाळेच्या आवारातील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम त्वरीत बंद करावे, असे आदेशच शिक्षण समिती अध्यक्ष शुभदा गुडेकर यांनी पालिका प्रशासनाला आज दिले.
येथील शाळेच्या आवारात सार्वजनिक शौचालय बांधण्यात येत आहे. त्याच्या शेजारीच विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळा आणि पालिकेने केली. येथे सांडपाणी तुंबणे आणि उकीरडा जमा होत होता. येथूनच वाट काढत विद्यार्थी पाणी पिण्यासाठी येत होते. नंतर त्याच पुन्हा त्याच पाण्यातून वर्गाकडे परतत होते. गुडेकर यांनी हा प्रकार पाहिला तेव्हा संतप्त होऊन पालिका अधिकार्यांची त्यांनी खरडपट्टी काढली.
पालिका अधिनियमानुसार शाळेच्या आवारात सार्वजनिक शौचालय बांधता येत नाही, असे गुडेकर म्हणाल्या. शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी देणे आणि स्वच्छ्ता राखणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे पालिकेचे कर्तव्य आहे, याची आठवण गुडेकर यांनी शाळा व पालिका अधिकार्यांना करून दिली. उपशिक्षणाधिकारी सुजाता खरे, अभियंता गोसावी आणि कुंभार तसेच प्रशासकीय अधिकारी अशोक मिश्रा आदी यावेळी उपस्थित होते.
वळणई शाळेची लवकरच पुर्नबांधणी
मालडच्या मालवणीमध्ये धोकादायक जाहीर केलेली वळणई शाळेची इमारत पाडण्यात आली होती. तिचे पुर्नबांधकाम तातडीने करा, असे आदेशही गुडेकर यांनी दिले. या शाळेच्या विद्यार्थ्यांना सध्या कांदिवलीच्या इराणेवाडीच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. तेव्हा इराणेवाडीच्या शाळेत जाण्यासाठी बसची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी पालिकेला दिले.