मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग आयोजित आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेचा दर्जा उंच आहे. सातत्याने भरारी घेणारी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेतून पालिकेतील कर्मचार्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. महापालिकेचे अनेक कर्मचारी, कामगार या स्पर्धेतून मोठे कलाकार, नाटककार, दिग्दर्शक झाले आहेत. महापालिकेने अशा स्पर्धेत भाग घेणार्या नाट्य, कलावंत मंडळांकरिता योग्य आर्थिक तरतूद करावी, असे निर्देश मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांनी प्रशासनाला दिले.
बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार विभाग आयोजित ४६ वी आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धा २०१६-१७ चा पारितोषिक वितरण समारंभ मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांच्या हस्ते काल (ता. ९ मे ) रात्री मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले मुंबई येथे झाला. या कार्यक्रमांस प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिनेनाट्य कलावंत, दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री, उपायुक्त (उद्याने व सुरक्षा) डॉ. किशोर क्षीरसागर, उपायुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) श्री. राम धस, उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे, प्रमुख कर्मचारी अधिकारी प्रभाकर वाघमारे तसेच महापालिकेचे विविध अधिकारी, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.
उपमहापौर हेमांगी वरळीकर म्हणाल्या की, महापालिकेचे कामगार कामकाज, कर्तव्य सांभाळून आपली कला जोपासत आहेत. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नाट्यस्पर्धापेक्षा महापालिकेतर्फे आयोजित केलेली ही स्पर्धा निश्चितच दर्जेदार आहे. कर्मचारी कलावंतांनी घेतलेली मेहनत दाद द्यावी, अशी आहे. ही कला अधिक कसदार होऊ शकते. या स्पर्धेकरिता केलेली तरतूद त्यामानाने कमी आहे, ती योग्य प्रमाणात करावी, असे निर्देश वरळीकर यांनी दिले.
पुष्कर श्रोत्री म्हणाले की, सिनेसृष्टीत वावरत असतांना अनेक कार्यक्रमांस मी उपस्थित राहतो, पण महापालिकेच्या आंतरविभागीय खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेत अतिशयोक्ती वाटत नाही. महापालिकेचे अनेक कलाकार आपले काम सांभाळून सिनेसृष्टीत वावरत आहेत. महापालिका नागरी सेवा – सुविधा तर पुरवितेच, सोबत असे कलावंतही घडवते, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. महापालिकेच्या कोणत्याही कार्यांस आपले सहकार्य राहील, असे वचनही श्रोत्री यांनी यावेळी दिले.
४६ व्या आंतरविभागीय /खात्यांतर्गत नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे ‘काटकोन त्रिकोणास’ प्रथम क्रमांक, द्वितीय सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून देवनार पशुवधगृहाचे ‘अम्मी’ तर तृतीय सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून ‘माणसांपरीस मेंढरी बरी’ यांना पारितोषिक प्राप्त झाले. उत्तेजनार्थ नाटकांत प्रथम ‘अ विभागीय कार्यालयांचे’, ‘जा खेळायला पळ’ तर द्वितीय नाटक म्हणून प्रमुख लेखापाल (वित्त) विभागाचे ‘हे नटेश्वरा’ हे घोषित करण्यात आले.
संपूर्ण स्पर्धेतील लक्षवेधी कलावंत म्हणून मिनाक्षी गोडबोले यांची निवड करण्यात आली.
सह कामगार अधिकारी सहदेव मोहिते यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय कामगार कल्याण अधिकारी हरिश जामटे यांनी परिश्रम घेतले.