मुंबई : अनधिकृत बांधकामाविरोधात पालिका दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘एम पूर्व‘ विभागात गोवंडीतील रफी नगर नाल्याच्या पात्रात झोपड्यांची अतिक्रमणे पालिकेने उठविली आणि ७७ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. या झोपड्यांमुळे नाल्याच्या रूंदीकरणाचे काम आठ वर्षांपासून रखडले होते. आता पालिकेने केलेल्या कारवाईमुळे नाल्याच्या रूंदीकरणास वेग येणार आहे.
‘के पश्चिम‘ विभागात येणार्या ‘जोगेश्वरी पश्चिम‘ परिसरात इमारतींच्या जागेत अनधिकृत बांधकामेही बांधण्यात आली होती. तीही तोडण्यात आली आहेत.
गोवंडीतील शिवाजीनगर मध्ये महापालिकेच्या परिमंडळ – ५ चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी कारवाई केली. यामुळे नाल्याच्या रुंदीकरणाच्या कामांना गती मिळणार आहे. पावसाळयाच्या कालावधीत या परिसरातील अहिल्याबाई होळकर मार्ग, ९० फूटी मार्ग व शिवाजीनगर बेस्ट बस डेपो आदी परिसरात पाण्याचा निचरा अधिक वेगाने होण्यास मदत होऊन वाहतूक सुरळीत होण्यास देखील मदत होणार आहे.
‘के पश्चिम‘ विभाग कार्यालयाच्या परिसरातील ‘जोगेश्वरी पश्चिम‘ परिसरात ‘जुहू गोरेगांव लिंक रोड‘ जवळ असणा–या ‘लिंकप्लाझा‘ या इमारतीच्या मोकळ्या जागेत व ‘हॉटेल कॅफे हेवन‘ च्या समोरच्या जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. याच इमारतीच्या समोर असणा–या दुस–या एका इमारतीत व्यवसायिक स्वरुपाची ४ दुकाने अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. ही सर्व अनधिकृत बांधकामे आज करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आली आहेत, अशीही माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.