नागपूर : पालघर जिल्ह्यात मागील दोन वर्षात भूकंपाचे अनेक धक्के जाणवले. या भूकंप प्रभावित परिसरामधील नागरिकांना भूकंपाच्या धक्याच्या अनुषंगाने जनजागृती व आपत्कालीन कार्यवाहीचे प्रशिक्षण आणि सर्वतोपरी मदत देण्यात येत असल्याची माहिती भूकंप पुनवर्सन मंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.
या संबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य आनंद ठाकूर यांनी मांडली होती.
यावेळी श्री देसाई म्हणाले, पालघर जिल्ह्यात बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत, तसेच स्थानिक जनतेच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या भितीचे वातावरण निर्माण होवू नये, म्हणून मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम शालेय स्तरावरून तसेच गावागावातील नागरिकांपर्यंत मोठ्या प्रमाणात राबविण्यात आलेला आहे. यापुढेही राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी एन. डी. आर. एफ. (NDRF), सिव्हिल डिफेन्स (Civil Defence) मार्फत वेळोवेळी प्रशिक्षण देखील देण्यात येत आहे.
भूकंपाबाबतच्या अभ्यासासाठी नॅशनल जिऑग्राफिक रिसर्च इन्स्टिट्यूट, हैद्राबाद यांचे पथक, डहाणू तालुक्यात 20 जानेवारी ते 11 नोव्हेंबर 2019 कार्यरत होते. तसेच भारतीय प्रौद्योगिक संस्था, मुंबई (IIT MUMBAI) येथील प्रा.रवि सिन्हा यांच्या समितीने शिफारस केल्यानुसार भुकंपग्रस्त भागातील भातसा व धामणी धरणावर एक्यलेरोमिटर बसविण्याची कार्यवाही सुरु आहे.
या चर्चेत सदस्य श्री रविंद्र फाटक यांनी सहभाग घेतला.