मुंबई : पालघर जिल्ह्यातील बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या उपाय योजनांमुळे या भागातील बालमृत्यू गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहे. त्याबाबत माहिती देणाऱ्या ‘पालघर बाल आरोग्याची यशस्वी वाटचाल‘ या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान करण्यात आले.
गेल्यावर्षी कुपोषणामुळे पालघर जिल्ह्यात बालमृत्यूंची संख्या वाढली होती. त्यावर उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना केली होती. वर्षभरात आरोग्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड,तलासरी भागातील दुर्गम पाड्यावर भेटी दिल्या. आरोग्य केंद्रांना अचानक भेटी दिल्या. पुनरागमन शिबिरासारखा अभिनव उपक्रम राबविला. यासोबतच आदिवासी बांधवांची मानसिकता बदलण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी देखील त्यांनी दौऱ्यात समजावून सांगितल्या. या सर्व उपाय योजनांबाबत आरोग्यमंत्र्यांनी या पुस्तिकेत माहिती दिली आहे.
आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेल्या विविध उपक्रमांची सचित्र माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे.
काल मंत्रिमंडळाच्या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आरोग्यमंत्री डॉ. सावंत, मुख्य सचिव सुमित मल्लिक, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.