रत्नागिरी : प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना उद्योग विभागामार्फत चालते. ही अतिशय चांगली योजना असून, सरपंचांनी घराघरात ही योजना पोहचवून लाभार्थ्यांची निवड करावी आणि जिल्ह्याला राज्यात अग्रेसर ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या शामराव पेजे सभागृहात प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना जिल्हा अंमलबजावणी समिती आढावा बैठक मंगळवारी झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदींसह सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेत लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी सरपंच प्रमुख आहेत. खादी ग्रामोद्योग महामंडळामार्फत ही योजना सामान्य लोकांना उभे करण्यासाठी चालविली जाते. 5 टक्के व्याजाने या योजनेत 1 लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. शिवाय 15 हजार पर्यंतचे कीट मोफत दिले जाणार आहे. हे कर्ज नियमित परतफेड केल्यास त्याच व्याजाने 2 लाखाचे कर्ज परत मिळणार आहे. सर्वसामान्य युवकाला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी अतिशय चांगली योजना आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी समन्वयाने ही योजना तळागळापर्यंत पोहचवावी आणि सर्वसामान्यांचे आशीर्वाद आणि पुण्य मिळवावे. त्यासाठी विशेष ग्रामसभा घ्यावी, असेही पालकमंत्री म्हणाले.