
मुंबई, 24 मे : भायखळा येथील रिचर्डसन ॲण्ड क्रूडास कंपनीच्या जागेवर निर्माणाधीन असलेल्या कोरोना काळजी केंद्र (जम्बो फॅसिलिटी) व्यवस्थेची राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज (दिनांक २४ मे २०२०) पाहणी केली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी पालकमंत्री शेख यांना सदर केंद्राबाबत सविस्तर तपशील दिला. संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री शेख यांनी तयारीबाबत समाधान व्यक्त केले. महानगरपालिकेच्यावतीने ठिकठिकाणी उभारण्यात येत असलेल्या समर्पित कोरोना केंद्रांची नियमितपणे पाहणी करुन पालकमंत्री शेख हे प्रशासनाला आवश्यक ते निर्देश देत आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी ही भेट दिली.
एकूण ८०० खाटांची (बेड) क्षमता असलेले हे केंद्र सुमारे ७० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर साकारत असून आठवडाभरात त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या केंद्रामध्ये ८०० पैकी ३०० खाटांसोबत रुग्णांना ऑक्सिजन पुरवठादेखील उपलब्ध असेल. याच ठिकाणी स्वतंत्रपणे भोजनगृहाची देखील सोय असून त्याद्वारे रुग्णांना दैनंदिन अल्पोपहार, जेवण आदी पुरवले जाईल. तसेच पिण्याचे गरम मिळावे, यासाठी संयंत्रे पुरवली जाणार आहेत. महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहे आणि स्नानगृहे, गिझर यासह प्रत्येक बेडला स्वतंत्र पंखा दिले जाणार आहेत. पुरेसे वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका नेमण्यात येणार असून त्यांच्यासाठी स्वतंत्र निवास आदी व्यवस्था करण्यात येत आहे.
या पाहणीप्रसंगी ई विभागाचे सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैर, सहायक अभियंता (परिरक्षण) जगताप, डॉ. दीपिका यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.